विजय उंडे । वीरभूमी- 09-Apr, 2023, 12:35 AM
श्रीगोंदा ः श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलकडून प्रबळ उमेदवारांचे दावे केले जात आहेत. दोन्ही पॅनलचे नेते आर्थिक गडगंज उमेदवारांच्या शोधात असून उमेदवारी मिळवतांना दोन नंबरवाल्यांची या निवडणुकीत चांदी होणार आहे. दोन्ही पॅनलकडून दोन नंबरवालेच जास्त उमेदवार झाल्यास नवल वाटायला नको.
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आ. बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे यांनी एकत्रित पॅनल करण्याची घोषणा केली असून त्यांच्या विरोधात माजी आमदार राहुल जगताप यांचे स्वतंत्र पॅनल उभे राहणार आहे.
माजी आमदार राहुल जगताप यांची निवडणुकीतील सूत्रे राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार सांभाळत आहेत. पाचपुते व नागवडे गटाची सूत्रे दत्तात्रय पानसरे, आदेश नागवडे, वैभव पाचपुते व लक्ष्मण नलगे या चौघांच्या हाती असून अर्थकारणाची सर्व गणिते या नेत्यांभोवती फिरणार आहेत.
आ. बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे या दोन्ही नेत्यात युती झाल्यानंतर उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून प्रत्येकी 9 जागेवर त्यांच्या समर्थकांना उमेदवार्या दिल्या जाणार असल्याचे समजते. नागवडे गटाला सोसायटीच्या 4 जागा, भटक्या विमुक्त जाती-जमाती साठी 1, ग्रामपंचायतसाठी 2 जागा (1 सर्वसाधारण व 1 दुर्बल घटक), आडते-व्यापारी 1 जागा व महिला प्रतिनिधी 1 जागा अशा 9 जागा नागवडे गटाला
तर आ. बबनराव पाचपुते गटाला सोसायटीच्या 3 जागा, ग्रामपंचायतमध्ये 2 जागा (सर्वसाधारण 1 व अनुसूचित जाती 1), महिला प्रतिनिधी 1 जागा, इतर मागासवर्गीय प्रवर्ग 1 जागा, हमाल मापाडी प्रतिनिधी 1 जागा, आडते - व्यापारी 1 जागा अशा 9 जागांवर उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे समजते.
माजी आमदार राहुल जगताप यांच्यावर एकाकी भार पडल्याने त्यांनी त्यांच्या साथीला स्व. सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते यांना घेतले आहे. बाळासाहेब नहाटा व अण्णासाहेब शेलार या जोडीच्या खांद्यावर सर्व जबाबदारी आहे. सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विरोधी पॅनलचे प्रमुख केशवराव मगर यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असून ते काय भूमिका घेतात यावर या निवडणुकीचे चित्र बरेचसे अवलंबून राहणार आहे.
सोसायटीला ‘वीस’ तर ग्रामपंचायतला ‘तीस’ घेऊन या.. प्रमुखांचा इच्छुकांना फतवा!!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक अंतिम टप्प्याकडे जात असतानाच उमेदवारीचे निकष ठरविले जात आहेत. सोसायटी मतदारसंघातून इच्छुकांसाठी ‘वीस’चे टार्गेट ठेवले जात आहे. या निवडणुकीत सर्वाधिक हाय व्होल्टेज मतदारसंघ ग्रामपंचायत राहणार आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात केवळ दोनच जागा सर्वसाधारण असल्याने या जागेवर माजी आमदार राहुल जगताप गटाकडून साजन पाचपुते व मितेश नहाटा यांची उमेदवारी निश्चित केल्याचे समजते. त्यांच्या विरोधात आ. पाचपुते व नागवडे गटाकडून दत्तात्रय पानसरे व आदेश नागवडे यांना आखाड्यात उतरविण्याची रणनीती आखली जात आहे. या मतदारसंघात सर्वाधिक ‘महापूर’ येण्याची शक्यता आहे.
CHPLexzIrAVqQRtB