अहमदनगर । वीरभूमी - 09-Apr, 2023, 01:28 PM
अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी शेवगाव, नेवासा तालुक्यात गारपीट झाल्यानंतर शनिवारी अकोले, नगर शहर, पारनेर, शेवगाव तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्याचप्रमाणे इतर तालुक्यातील काही भागात हलकाचा पाऊस झाल्याने शेतातील उभी पिके वाया गेली आहेत.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला असून नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने तातडीने पंचनामे करुन मदत करावी, अशी मागणी होत आहे.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास नगर शहरात मुसळधार पावसासह गारपीट झाली. सोसाट्याच्या वार्यामुळे अनेक भागातील झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला होता. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील झाडही पडले आहे.
नगर शहरात सावेडी, पाईप लाईन रोड, कल्याण रोड, मुख्य शहर या भागात वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली असून, काही भागात या पावसामुळे पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान रविवारी देखील विजेच्या कडकडट्यांसह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानातही मोठी घट झाली असून, वातावरणात गारवा तयार झाला होता. शनिवारी दुपारी अकोले शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांत गारांचा पाऊस पडला तर काही भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतात व रस्त्यावर पाणी वाहत होते. अवकाळी पावसामुळे शेती पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अकोले शहरासह इंदोरी, मेहेंदुरी, रुंभोडी, टाकळी, ढोकरी, गर्दनी, कुंभेफळ, कळस खुर्द व बुद्रुक, परखतपूर, चास, लिंगदेव, लहीत, वाशेरे या भागांत जोरदार पाऊस झाला तर इंदोरी-मेहेंदुरी परिसरात गारांचा पाऊस पडला. तर आढळा विभागात सावरगाव पाट, समशेरपूर, टाहाकारी या गावांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे काही भागात पाणी वाहत होते.
अवकाळीने 50 गावांतील पिकांचे नुकसान : कृषी विभागाने शनिवारी केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानूसार शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल 50 गावांना फटका बसला. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नेवासा व शेवगाव तालुक्यात झाले आहे. नेवासा तालुक्यातील 29 गावातील 8 हजार 400 शेतकर्यांचे 4 हजार 300 हेक्टरवरील शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर शेवगाव तालुक्यातील 14 गावातील 3 हजार 673 शेतकर्यांचे 2 हजार 197 हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पारनेर तालुक्यातील पाच गावात 397 शेतकर्यांचे 180 हेक्टरवरील पिकांचे, कोपरगाव तालुक्यातील एका गावात 1 शेतकर्याचे 0.83 हेक्टरवरील आणि नगर तालुक्यातील एका गावात 12 शेतकर्यांचे 7 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी झालेला मंडलनिहाय पाऊस : सावेडी 12 मि.मी, केडगाव 11 मि.मी, जेऊर 18 मि.मी, वांबोरी 20 मि.मी, भाळवणी 11 मि.मी, निघोज 12.5 मि.मी, टाकळी ढोकेश्वर 2.5 मि.मी, ढोरजळगाव 12 मि.मी, एरंडगाव 16.8 मि.मी, घोडेगाव 39.8 मि.मी, चांदा 27.5 मि.मी, नेवासा 12.5 असा आहे.
qqcbl5