शेवगाव । वीरभूमी - 11-Apr, 2023, 10:06 AM
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, देवटाकळी, भातकुडगाव परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर दुसर्याच दिवशी सकाळी आजी-माजी आमदारांनी शेतकर्यांच्या बांधावर हजेरी लावत पहाणी केली.
मात्र मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे व महापूर नुकसानीची भरपाईच अजुन मिळाली नाही. आजी-माजी आमदारांनी नुकसान पहाणीचा फार्स करण्यापेक्षा तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी सरकार दरबारी वेगवान पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा स्वाभिमानीचे दत्तात्रय फुंदे यांनी व्यक्त केली.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, देवटाकळी, भातकुडगाव, एरंडगाव, ढोरजळगाव परिसरातील सुमारे 14 गावांतील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार 3 हजार 673 शेतकर्यांचे 2 हजार 197 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या व पिल्ले दगावले. काही ठिकाणचे राहत्या घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडले आहेत.
या अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे. मात्र सत्ताधारी व विरोधक फक्त नुकसानग्रस्त भागाच्या पहाणीचा फार्स करत आहेत. अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळीच आजी - माजी आमदारांनी स्वतंत्रपणे शेतकर्यांच्या बांधावर व शेतात जावून पहाणी करत फोटो सेशन केले. मात्र या शेतकर्यांना मदत कधी मिळणार, असा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
यामुळे पहाणी दौरा तातडीने आणि पैसे बारा महिण्यांनी असे म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर येत आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे पैसे अजूनही शेतकर्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत.
त्याचपमाणे वरुर, भगूर, आखेगाव, खरडगाव, जोहरापूर या नदी काठच्या गावांत महापूर येवून जनावरे वाहून गेली होती. घरांचे अतोनात नुकसान झाले. नदीकाठची शेतीपिके वाहुन गेली. या घटनेने शेतकरी उद्धवस्त झाला. मात्र गेल्या दीड-दोन वर्षापासून अद्यापर्यंत या नुकसानीची भरपाई शेतकर्यांना मिळालेली नाही. याचा विचारही आजी-माजी आमदारांनी करावा. फक्त नुकसानग्रस्त भागांची पहाणी करुन काही होत नाही.
संबधित तलाठ्यांना शेतकर्याच्या बांधावर जावून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि नुकसानीची तातडीने मदत मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे नुकसान निरंक दाखवण्यात आलेले आहे. मात्र शेतकर्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. अशा शेतकर्यांनाही मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी दत्तात्रय फुंदे यांनी केली आहे.
एकीकडे सरकार व त्यांचे मंत्री कायम सांगतात हे सरकार सर्वसामान्यांचे, शेतकर्यांचे सरकार आहे. मात्र फक्य घोषणा होतात, मात्र अडचणीतील शेतकर्यांना मदत मिळत नाही. यामुळे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा फार्स करण्यापेक्षा नुकसान भरपाई मिळण्यासाठी सरकार दरबारी वेगवान जाहिरातीपेक्षा वेगवान पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा स्वाभिमानीचे दत्तात्रय फुंदे यांनी व्यक्त केली आहे.
ep2jpq