पाचपुते-नागवडेंना भिडून जगतापांनी आखले भविष्याचे मनसुबे
नागवडे - पाचपुते एकत्र येतात त्यावेळी मतदार विरोधात जातात हा तालुक्याचा इतिहास
विजय उंडे । वीरभूमी - 15-Apr, 2023, 09:03 AM
श्रीगोंदा : आ. बबनराव पाचपुते व नागवडे कुटुंबीय जेंव्हा जेंव्हा एकत्र आले त्या-त्या वेळी मतदारांनी चिडून जाऊन त्यांच्या विरोधात मतदान केले असा दिलीप गांधी यांच्या पासून ते घनशाम शेलार यांच्या पर्यंतचा इतिहास सांगतो. हे बुमरँग बाजार समितीच्या निवडणुकीत नागवडे-पाचपुते कसे थोपवतात तसेच माजी आमदार राहुल जगताप याचा कसा फायदा घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
एकेकाळी आ. बबनराव पाचपुते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांची पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणना व्हायची. नागवडे कुटुंबीय विशेषतः स्व. शिवाजीराव नागवडे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ पाईक होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्य पातळीवर काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन एकत्रित निवडणुका लढवण्याचा दोन्ही पक्षांच्या फर्मानामुळे नागवडे - पाचपुते एका स्टेजवर यायचे.
नगर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेल्याने येथून राष्ट्रवादीचा उमेदवार उभा केला जायचा. तालुक्याच्या राजकारणात नागवडे-पाचपुते एकत्र आल्यानंतर कागदावर मोठी राजकीय शक्ती दिसायची. भाजपची उमेदवारी दिलीप गांधी यांच्या सारख्या अल्पसंख्यांक व्यक्तीला असायची. तालुक्यात त्यांची बोटावर मोजण्याइतकेही कार्यकर्ते नसायचे मात्र तीन लोकसभा निवडणुकांत त्यांना चाळीस हजारांच्यावर मताधिक्य मिळाल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येते. त्याचीच पुनरावृत्ती 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झाली.
राजेंद्र नागवडे व त्यावेळचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या तलवारी म्यान केल्या. राजेंद्र नागवडे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून आ. बबनराव पाचपुते यांना पाठिंबा दिला. खास श्रीगोंद्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारीचा एबी फॉर्म जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याकडे कोरा पाठवून दिला. त्यावेळी दररोज राजकीय परिस्थिती असे वळणे घेत होती की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारीची पंचाईत निर्माण झाली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घनशाम शेलार यांना उमेदवारी द्यावी लागली.
पाचपुते - नागवडे एकत्र आल्याने शेलार यांची उमेदवारी त्यांच्यासमोर अतिशय कमकुवत वाटत होती. पाचपुते-नागवडे एकत्र आल्याने वर्षानुवर्षे संघर्ष करणारे कार्यकर्ते चिडले. घनश्याम शेलार यांची सुप्तावस्थेत कोणतीही यंत्रणा नसताना लाट निर्माण झाली. ती लाट शरद पवारांच्या सभेने उफाळून आली. कदाचित शरद पवारांची सभा झाली नसती तर घनशाम शेलार सुप्त लाटेच्या जोरावर तीस ते पस्तीस हजार मतांनी आमदार झाले असते असे अनेक राजकीय तज्ञांचे मत आजही आहे.
नागवडे-पाचपुते एकत्र आले की, मतदार चिडून विरोधी मतदान करतात. हे आजपर्यंतच्या इतिहासाने दाखवून दिले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत ही लाट हे दोन्ही नेते कशी थोपवतात यावरच त्यांचे यश अपयश अवलंबून आहे. नागवडे - पाचपुते एकत्रित आल्यास विरोधी लाट तयार होते, हे गणित ओळखून राहूल जगताप यांनी त्यांच्या विरोधात लढण्याचे धनुष्य पेलले आहे. नागवडे - पाचपुते यांना टक्कर देणारा पर्यायी नेता म्हणून जनमानसात प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी होत आहेत, असे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.
उमेदवारी माघारी घेणारे होणार मालामाल?
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे. मतदारांचा भाव वधारला आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून इच्छुक मोठया प्रमाणात असल्यामुळे सर्वच गटांत उमेदवारीवरुन रस्सीखेच आहे. माघार घेणार्या उमेदवारांना अनन्य साधारण महत्व आले असून ते मालामाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक निवडणुकांमध्ये माघारी घेण्यासाठीच अनेकजण फॉर्म भरतात हे आता लपून राहिलेले नाही. माघारीतील मलई लाटलेले याही निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तडजोडी करणार असल्याचे दिसून येत आहे.
Comments