भाजपाचे तालुकाध्यक्ष यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याने नागवडे व पाचपुते यांच्यामध्ये तणाव वाढला
विजय उंडे । वीरभूमी- 17-Apr, 2023, 12:24 AM
श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे यांच्यामध्ये आघाडी झाल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र सहकार महर्षी नागवडे कारखान्याच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचंड तणाव वाढला असून भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांच्या उमेदवारीवर नागवडे समर्थक उमेदवार योगेश भोईटे यांच्याकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सहकार महर्षी नागवडे साखर कारखाना व श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रक्रिया एकाचवेळी सुरू आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये उमेदवारी भरण्याची प्रक्रिया संपली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकत्रित येत ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गाण्यावर ठेका धरला आहे. तर साखर कारखान्याच्या पोट निवडणुकीत ‘दुष्मनोंका दुष्मन मैं हूं डॉन’ या गाण्याप्रमाणे कारखान्याच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते आपली डॉनगिरी दाखवित आहेत.
राष्ट्रीय व राज्यस्तरावर भाजप व काँग्रेसमध्ये सध्या जोरात राजकीय संघर्ष चालू आहे. मात्र श्रीगोंद्याच्या बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे मनोमिलन झाले आहे. माजी आमदार राहुल जगताप व त्यांना समर्थन करणारे बाळासाहेब नाहाटा व अण्णासाहेब शेलार यांचे राजकारण उखडून टाकण्यासाठी पाचपुते - नागवडे एकत्र आले आहेत. अण्णासाहेब शेलार व बाळासाहेब नाहाटा यांच्या ‘गेमचेंजर’ भूमिकेमुळे तालुकास्तरावरील एक एक संस्था माजी आमदार राहुल जगताप यांच्या ताब्यात घेत असल्याने पाचपुते व नागवडे या दोन्ही गटांमध्ये अस्वस्थता पसरली होती.
या अस्वस्थतेतून नागवडे-पाचपुते या दोन्ही गटांनी एकत्रित येत माजी आमदार राहुल जगताप यांचा पाडाव करण्याचे ठरविले आहे. मात्र सहकार महर्षी नागवडे कारखान्याच्या पोट निवडणुकीत हे दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता वाढली आहे.
भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांचा उमेदवारी अर्ज कोणत्याही परिस्थितीत बादच करायचा यासाठी नागवडे समर्थकांकडून सर्व अस्रांचा वापर सुरू आहे तर आ. बबनराव पाचपुते व खा. सुजय विखे यांनी संदीप नागवडे यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊ नये, यासाठी त्यांची सर्व राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
मी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे तक्रार करूनही माझा ऊस नेला नाही ः संदीप नागवडे
सहकार महर्षी नागवडे साखर कारखान्याला माझा ऊस दोनदा गेला मात्र तिसर्या वर्षी राजकीय असुयेपोटी सत्ताधार्यांनी ऊस नेण्यासाठी टाळाटाळ केली. कारखाना प्रशासन माझा ऊस नेण्यासाठी जाणूनबुजून विरोध करत आहे. हे माझ्या लक्षात आल्यावर मी साखर सहसंचालकांना तक्रार अर्ज केला. साखर कारखान्याचा कारभार मनमानी आपल्या मर्जीनुसार चालतो की, शासनाच्या अधिपत्याखाली चालतो हे माझा अर्ज वैध झाल्यानंतर सत्ताधार्यांच्या लक्षात येईल.
ROSdkKAzj