शेवगाव । वीरभूमी- 30-Apr, 2023, 08:08 PM
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच्या सर्व 18 जागांवर राष्ट्रवादी काँगेसने मोठ्या फरकाने विजय मिळवत बाजार समितीतील सत्ता कायम राखली आहे. या निवडणुकीत भाजपा आ. मोनिका राजळे यांनी मनसे, काँग्रेसला सोबत घेत एकत्र निवडणूक लढवली. मात्र त्याचा फारसा फरक जाणवला नाही.
शेवगाव बाजार समितीसाठी आज 18 जागेसाठी शांततेत सुमारे 98 टक्के मतदान झाले. मतदानानंतर तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीने आघाडी कायम ठेवत सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला.
विजयी उमेदवारांमध्ये सोसायटी मतदार संघ सर्वसाधारण जागेवर - राहुल शंकरराव बेडके (632), अशोक अण्णासाहेब धस (629), गणेश बाबासाहेब खंबरे (626), अॅड. अनिल बबनराव मडके (627), नानासाहेब बबन मडके (615), एकनाथ दिनकर कसाळ (631), जमीर अब्बासमियाँ पटेल (619), महिला राखीव- चंद्रकला श्रीकिसन कातकडे (683), रागिणी सुधाकर लांडे (682), इतर मागास वर्ग- हनुमान बापुराव पातकळ (664), विमुक्त जाती भटक्या जमाती- राजेंद्र शिवनाथ दौंड (679), ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण- संजय मोहन कोळगे (537), अशोक रामभाऊ मेरड (515), अनुसूचित जाती जमाती- अरुण भास्कर घाडगे (549), दुर्बल घटक- प्रीती रामभाऊ अंधारे (534), व्यापारी आडते मतदार संघ - जाकिर शफी कुरेशी (153), मनोज काशिनाथ तिवारी (158), हमाल मापाडी मतदार संघ- प्रदीप नानासाहेब काळे (189) हे उमेदवार विजयी झाले.
आज सकाळी मतदानाला सुरुवात होवून सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुमारे 98 टक्के शांततेत मतदान झाले. मतदानावेळी आ. मोनिका राजळे, माजी आ. चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे माजी सभापती क्षितीज घुले मतदान केंद्राबाहेर ठाण मांडून होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन व्ही. यु. लकवाल यांनी काम पाहिले.
शेवगाव बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर खा. डॉ. सुजय विखे, आ. मोनिका राजळे यांनी प्रारंभी बैठक घेत निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला असलेले वातावरण टिकून ठेवता आले नाही.
राष्ट्रवादीच्या ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाने मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व जागा जिंकत वर्चस्व कायम राखले. निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
sTAXPjYNdMvO