कर्जत बाजार समितीत भाजपाचे ‘रामराज्य’
सभापतिपदी काकासाहेब तापकीर, उपसभापतिपदी अभय पाटील । राष्ट्रवादी-काँग्रेसचा एक संचालक फुटला
कर्जत । वीरभूमी - 12-Jun, 2023, 02:24 PM
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापती पदाच्या निवडीत भाजपाचा झेंडा फडकला असून सभापतीपदी काकासाहेब तापकीर तर उपसभापतीपदी अभय पाटील यांची निवड झाली. पदाधिकारी निवडीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे एक मतदान बाद ठरले तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या एका संचालकांने भाजपाला साथ दिली.
समसमान संख्या असताना राष्ट्रवादीला कोणी दगा दिला? याचा शोध आमदार रोहित पवार यांना करावा लागेल. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवड बाजार समितीच्या कार्यालयात प्राधिकृत अध्यासी अधिकारी एस डी सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पार पडली.
यामध्ये सभापती पदासाठी भाजपाकडून (कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल) राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजपात सामील झालेले तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनल) गुलाब तनपुरे यांचा अर्ज दाखल झाला. उपसभापती पदासाठी भाजपाकडून अभय पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे श्रीहर्ष शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छाननी प्रक्रियेत चार ही अर्ज वैध ठरले.
वैध ठरलेल्या अर्जानंतर गुप्तपणे मतदान प्रक्रिया घेण्यात आली. गुप्त मतदान प्रक्रियेत सभापती पदासाठी भाजपाच्या काकासाहेब तापकीर यांना 9 मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या गुलाब तनपुरे यांना 8 मते मिळाली. एक मत अवैध ठरल्याने तापकीर यांना विजयी घोषित करण्यात आले. उपसभापती पदासाठी भाजपाच्या अभय पाटील यांना 10 मते मिळाली तर काँग्रेसचे श्रीहर्ष शेवाळे यांना 8 मते मिळाली. आमदार रोहित पवार यांच्या पॅनलचा कोणता संचालक फुटला आता हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.
पण राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आणि दोन्ही आमदारांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कर्जत बाजार समितीवर भाजपाच्या राम शिंदेंचा झेंडा फडकला असून त्यांनी विरोधी आमदार रोहित पवार यांना पदाधिकारी निवडीत उघड-उघड धोबीपछाड दिली. पदाधिकारी निवडीनंतर नूतन सभापती काकासाहेब तापकीर आणि उपसभापती अभय पाटील यांचा भाजपाकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार प्रा राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, प्रवीण घुले, दादा सोनमाळी, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, सचिन पोटरे, अशोक खेडकर, बंटी यादव, प्रकाश शिंदे, प्रा शशिकांत पाटील, गणेश क्षीरसागर, अनिल गदादे, सोयब काझी, पप्पू धोदाड, काकासाहेब धांडे, प्रवीण तापकीर, प्रवीण फलके, सुनील यादव, चिंतामणी मुरकुटे, विनोद दळवी, नंदलाल काळदाते, राहुल निंबोरे आदी उपस्थित होते. या प्रसंगी संचालक बळीराम यादव, बापूसाहेब नेटके, मंगेश जगताप, रामदास मांडगे, लहू वतारे, नंदकुमार नवले, विजया गांगर्डे उपस्थित होते. शेवटी सर्वानी कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराजांच्या मंदिरात जात दर्शन घेतले.
रोहित पवार यांना पंधरा दिवसात तिसरा झटका :- सभापती-उपसभापती निवडीनंतर आमदार राम शिंदे यांनी नूतन पदाधिकारी सत्कार केल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप केला. मागील पंधरा दिवसांत आमदार रोहित पवारांना हा तिसरा झटका दिला आहे. जामखेड बाजार समिती सभापती, खर्डा ग्रामपंचायत आणि आजचा कर्जत बाजार समिती पदाधिकारी निवडी. शेवटी आपला तो आपलाच असतो याची प्रचिती मतदार देत असल्याचे आ. राम शिंदेंनी ठणकावून सांगितले.
Comments