तरुणांच्या क्रयशक्तीचा वापर केल्यास देशाची अर्थव्यवस्था सुधारेल
आ. डॉ. किरण लहामटे । छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिराचे उद्घाटन
अकोले । वीरभूमी - 12-Jun, 2023, 02:39 PM
भारत देश हा सर्वात जास्त क्रयशक्तीचा देश असून भारताचा जगात प्रथम क्रमांक आहे. देशात युवकांची संख्या सर्वात जास्त असून त्यांच्या क्रयशक्तीचा योग्य वापर केल्यास देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, असे प्रतिपादन अकोले तालुक्याचे आ.डॉ. किरण लहामटे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिराचे उदघाटन केल्यानंतर युवक युवतींना मार्गदर्शन करताना आ. लहामटे बोलत होते. या शिबिराचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजूर, शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था केळी-कोतुळ, मवेशी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोले यांनी आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अकोले नगर पंचायतच्या नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी होत्या.
यावेळी व्यासपीठावर राजूरच्या सरपंच सौ.पुष्पाताई निगळे, शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चासकर, लेखक तथा साहित्यिक व शिक्षक असलेले दीपक पाचपुते, अकोले महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नितीन आरोटे, अॅड. निगळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री. निळे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूरचे प्राचार्य संजय कुटे, जी. टी. गवळी, अकोले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, गट निदेशक श्री. नागरे, श्री. एम. जी. गायकर उपस्थित होते. तसेच सर्व कर्मचारी व युवक युवती,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अकोले आयटीआयच्या व विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मॉडेल्स (उपकरणे) प्रदर्शनाला प्रमुख मान्यवरांनी व उपस्थित युवक, पालकांनी भेट देऊन।माहिती घेतली. यावेळी आ. लहमटे म्हणाले की, युवक युवीतीनी आपले ध्येय निश्चित करून वय वर्षे 13 ते 21 या कालावधीत मेहनत, परिश्रम घेतले तर ते जीवनात यशस्वी होऊ शकतात. अनेक कमी शिक्षित युवक हे यशस्वी उद्योजक झालेले पहायला मिळतात.
त्यासाठी हे विचार व्यासपीठ असून त्याचा उपयोग युवकांनी करून घ्यावा. आपल्याला जे ज्ञान मिळते ते नुसते डोक्यात ठेवुन उपयोग नाही.पुस्तकी ज्ञान आवश्यक असले तरी प्रॅक्टीकली अनुभव फार महत्वाचा आहे. सर्व ठिकाणी परफेक्शन आवश्यक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी वक्तशीरपणा फार गरजेचा आहे.
जो वेळ पाळणार नाही, वेळेचा सदुपयोग करणार नाही त्यांचे भवितव्य अडचणीचे होणार आहे. आय.टी.आय. अकोलेच्या विद्यार्थ्यांनी विविध उपकरणे बनविली ते कौतुकास्पद आहे. तालुक्यातील गारवाडी येथील आदिवासी व्यक्ती शेतीचे औजारे बनवून नवं निर्मितीचा आनंद घेत आहे. कौशल्य प्रशिक्षण योजनेत सर्व समाजातील युवकांना संधी मिळाली पाहिजे. असे मत व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. सोनालीताई नाईकवाडी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, आजच्या काळात युवकांना महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करताना समाजाप्रती असलेले कार्य समजावुन सांगणे गरजेचे झाले आहे. छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य गरीब, दलित व सर्व सामान्य माणसांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे. युवकांनी नव्हेतर सर्वांनीच आपल्याला जे काम आलेले आहे त्यामध्ये झोकून देऊन व प्रामाणिकपणे सदर काम केल्यास तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही.
यावेळी शिक्षण तज्ज्ञ भाऊसाहेब चासकर, दीपक पाचपुते व प्रा. डॉ. नितीन आरोटे यांनी युवक युवतींना करियर मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य संजय कुटे यांनी केले. सूत्रसंचालन एस. के. मंडलिक यांनी केले व आभारही मानले.
yZtEeBrDWgSnzYo