अहमदनगर । वीरभूमी - 13-Jun, 2023, 12:33 PM
भाजपमधील निष्ठावंत, जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात एल्गार पुकारत निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. पक्षाचे माजी मंत्री आ. राम शिंदे यांच्याही कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे भाजपमधील नवाजुना वाद उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भविष्यात जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा नगरमध्ये मोठा मेळावा होणार आहे. या संदर्भात पक्षाच्या जिल्हाभरातील निष्ठावंतांना एकत्र करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शिष्टमंडळ नेण्याचेही बैठकीत ठरले.
पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड व ज्येष्ठ पदाधिकारी अल्लाउद्दीन काझी यांच्या पुढाकाराने अहमदनगरच्या सरकारी विश्रामगृह येथे भाजपा निष्ठावंतांची बैठक घेण्यात आली. यावेळी पदाधिकारी वसंत लोढा, शांतीलाल कोपनर, बाळासाहेब सोनवणे, अनिल गट्टाणी, अशोक खेडकर, रघुनाथ आंबेकर, दादासाहेब बोठे, बाळासाहेब पोटघन, संतोष लगड, स्वप्निल देसाई, चेतन जग्गी, अशोक आहुजा, कृष्णकांत बडवे, अशोक गायकवाड, रवी सुरवसे, राजेंद्र मोहिते, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींकडे शिष्टमंडळ नेण्याची जबाबदारी बेरड, काझी व लोढा यांच्यावर सोपवण्यात आली. भाजप आता मुंडे-महाजनांचा पक्ष राहिला नाही. खूप बदलला आहे.
पक्षातील निष्ठावंतांना डावलले जात आहे. किमान पक्षाची संघटना तरी निष्ठावंतांकडे दिली जावी अन्यथा पक्षाच्या व्होट बँकेमध्ये अस्वस्थता वाढेल. या संदर्भात लवकरच व्यापक बैठक घेऊन पक्षश्रेष्ठींसमोर जिल्ह्यातील निष्ठावंतांची नाराजी मांडण्याची भावनाही बोलून दाखवण्यात आली. बाहेरील नेत्यांना पक्षात घेण्यास हकरत नाही, मात्र निष्ठावंतांना डावलले जाणार नाही याची दक्षता पक्षश्रेष्ठींनी घ्यावी. सध्या पक्षाच्या प्रत्येक बैठकीत व कार्यक्रमात निष्ठावंतांचा अपमान होतो, कोणत्याही कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांना विश्वासात घेतले जात नाही, सन्मान केला जात नाही. पक्षाचे निवडक पदाधिकारी वगळता अन्य कोणालाही विचारले जात नाही. पक्षाचे काम व्हॉटस् अॅपवर सुरू आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यातील थेट संवाद संपला आहे.
अनेक पदाधिकारी ठेकेदारीत व्यग्र आहेत. सन 2014 ते 2019 दरम्यान पक्षाची सत्ता असतानाही निष्ठावंतांना संधी मिळाली नाही, अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. वक्त्यांनी विखे पिता-पुत्र व आ. शिंदे यांची थेट नावे घेतली नाहीत, मात्र सूचक शब्दात त्यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली. गेल्या 30 ते 40 वर्षात अनेकांनी पक्षवाढीसाठी परिश्रम घेतले. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची 30 ते 35 टक्के व्होट बँक आहे. बाहेरून घेतलेल्या नेत्यांची दहा ते पंधरा टक्के मते त्यात समाविष्ट केल्यास 51 टक्के मतांनी बाहेरच्यांना राजकीय संधी मिळते. त्यामध्ये निष्ठावंतांना डावलले जात आहे. त्यातून पक्षाची व्होट बँक संपत आली आहे. पक्षाचे तिनही जिल्हाध्यक्ष निष्ठावंत झाले नाही, तर व्होट बँक पक्षाला मतदान करणार नाही. कोणच्याही प्रचाराला बाहेर पडणार नाही, असाही इशारा यावेळी देण्यात आला.
GAQzsFnTeLc