शेवगाव । वीरभूमी - 14-Jun, 2023, 11:37 PM
सन 2014 पासून या योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी आणला आहे. मागील आर्थिक वर्षात योजनेसाठी 18 कोटीची तरतूद करण्यात आली ती कामे आता पूर्ण झाली आहेत. यावर्षी 36 कोटी रुपयांची तरतूद असून सदर कामे चालू आहेत. मार्च 2024 पर्यंत शेतकर्यांना प्रत्यक्षात योजनेचा लाभ देण्यास सुरुवात होईल. त्याचप्रमाणे आगामी काही दिवसांत ताजनापुर उपसा सिंचन योजना टप्पा दोन पूर्णत्वास नेण्याचा आपला मानस असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
ताजनापुर उपसा सिंचन योजना टप्पा 2 चे खानापूर येथील मुख्य पंपगृह, कळयंत्र आवार, स्थापत्य विभाग, विद्युत विभाग, यांत्रिकी कामाची, तसेच पाईप वितरण व्यवस्थेची पाहणी आ. मोनिकाताई राजळे यांनी केली. तसेच या योजनेवर असलेले वितरण कुंडाची पाहणी करून तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना आमदार मोनिकाताई राजळे यांनी संबंधितांना दिल्या.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सदस्य बापूसाहेब पाटेकर, मध्यम प्रकल्प नगर कार्यकारी अभियंता के. एल. मासाळ, यांत्रिकी विभाग कार्यकारी अभियंता अजिंक्य थोरात, ताजनापूर प्रकल्प उपविभागीय अधिकारी एस. यु. कुलकर्णी, विद्युत विभाग उपविभागीय अधिकारी एस. बी. माळी, संबंधित ठेकेदार तसेच लक्ष्मणराव टाकळकर, सुरेशराव नेमाने, जगन्नाथ भागवत, राजाराम तेलोरे, भगवान तेलोरे, तुकाराम थोरवे राजेंद्र घुगे, पीरमोहम्मद शेख, सोमनाथ मडके, नारायण मडके, आसाराम मडके, अर्जुन ढाकणे, ज्ञानेश्वर कुलट, पंडित भागवत, मधुकर गोरे, एकनाथ खोसे, गणेश थोरात, रासपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र घनवट आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. मोनिकाताई राजळे म्हणाल्या, ताजनापूर उपसा सिंचन योजना हा पायलट प्रोजेक्ट असून टप्पा क्र. 2 चे मुख्यपंपगृह, विद्युत कामे पूर्ण झाली आहेत. तसेच चापडगाव, नजीक बाभुळगाव, सोनेसांगवी, तसेच गदेवाडी येथील दोन वितरण कुंडाची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. मागील काळात प्रकल्पाचे डिझाईन तसेच भूसंपादन यासाठी बरेच कालावधी गेला आहे. लवकरच कामे पूर्ण होवून मार्च 2024 पर्यंत लाभार्थी शेतकर्यांना लाभ देण्यास सुरुवात होईल, असे सांगितले.
शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील खानापूर, अंतरवाली, नजीक बाभूळगाव, राक्षी, कुरुडगाव, रावतळे, मळेगाव, गदेवाडी, ठाकूर निमगाव, सोनेसांगवी, कोळगाव, हसनापूर, वरखेड, चापडगाव, दहिगाव-शे, प्रभूवाडगाव, मंगरुळ खुर्द, मंगरुळ बुद्रुक, आंतरवाली बुद्रुक या गावासाठी वरदान ठरणारी ताजनापूर सिंचन योजना टप्पा क्र. 2 चे उर्वरित कामासाठी आवश्यक त्या निधीची मागणी करून शासनाच्या माध्यमातून ती तरतूद करण्यात येईल. परंतु बहुप्रतिक्षित या योजनेचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे सूचना आमदार मोनिकाताई राजळे यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता के. एल. मासाळ यांनी केले. तर ताजनापूर प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी एस. यु. कुलकर्णी यांनी आभार मानले.
Comments