प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा । 2024 च्या महाविजयााठी भाजपा सज्ज
अहमदनगर । वीरभूमी - 19-Jul, 2023, 10:47 AM
भारतीय जनता पार्टीसाठी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शहर जिल्हाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष म्हणुन अभय जनगन्नाथ आगरकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणुन दिलीप देविदास भालसिंग तर उत्तर जिल्हाध्यक्ष म्हणुन विठ्ठलराव वकिलराव लंघे यांच्या नियुक्त्या केल्याचे जाहीर केले आहे.
मागील काही दिवसापासून शहर जिल्हाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष निवडी रखडल्या होत्या. मात्र आता या निवडी जाहीर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडी जाहीर करतांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकार्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा असल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
1ce89c