शेवगाव येथील घटना । आरोपींवर गुन्हा दाखल
शेवगाव । वीरभूमी - 19-Jul, 2023, 11:18 AM
अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने शहरातील एका महिलेने रविवार (दि. 16 रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन प्रियकर आरोपीसह एका महिलेवर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या महिलेच्या मुलीनेही अश्लील व्हिडीओची माहिती समजल्यावर शनिवार (दि. 15) विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेतील आरोपीचे नाव प्रशांत घुटे असे आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पतीशी घटस्फोट झालेल्या संबंधित महिलेशी प्रशांत घुटे याचे प्रेमसंबंध होते. तो तिच्या घरी येत जात होता. दरम्याने आरोपीने महिलेचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले होते.
दरम्यान, घुटे याचे अन्य एका महिलेशीही प्रेमसंबंध होते. त्यातच त्या दुसर्या महिलेने संबंधित व्हिडिओ अगोदरच्या महिलेच्या भावाच्या मोबाईलवर पाठविले. त्याला घरी बोलावले. परंतु त्याने नकार दिल्याने तिने ‘तुझ्या बहिणीला बदनाम करीन, तिचे जगणे मुश्कील करीन व हे व्हिडीओ सर्वांना दाखवीन, अशी धमकी दिली. त्यानंतर या व्हिडीओबाबत भावाने बहिणीला विचारणा केली, तेव्हा आरोपीने तिचे तसे व्हिडिओ काढल्याची माहिती दिली.
दरम्यान, याची माहिती तिच्या मुलीला समजल्याने तिने शनिवारी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या त्रासातून संबंधित महिलेने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी प्रशांत घुटे व त्या दुसर्या महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
dDnKMChPXJeSj