शेवगाव । वीरभूमी - 21-Jul, 2023, 12:27 PM
विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक उंचीवर जावे, असे प्रतिपादन कोटा अकॅडमी कराडचे संचालक डॉ. महेश खुस्पे यांनी केले.
शेवगाव येथील कोटा एक्सलन्स सेंटर व आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने कर्मयोगी जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या 104 व्या जयंती निमित्त इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. महेश खुस्पे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड.डॉ. विद्याधर काकडे, जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मण बिटाळ, प्राचार्य संपतराव दसपुते, कोटा एक्सलन्स सेंटर शेवगावचे डायरेक्टर हरिष खरड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. खुस्पे म्हणाले की, यश मिळवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. विविध विषयांचा अभ्यास करत असताना त्या विषयातील बेसिक माहित असणे गरजेचे असते.
प्रा. खुस्पे यांनी विद्यार्थ्यांना जेईई, नीट, आयआयटी या परीक्षेविषयी मार्गदर्शन केले तसेच दहावी व बारावी नंतर विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा हर्षदाताई काकडे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कोटा एक्सलन्स सेंटरच्या माध्यमातून करिअरच्या विविध वाटा जाणून घ्याव्यात असे सांगितले.
कार्यक्रमासाठी शेवगाव शहरातील व परिसरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. लक्ष्मण बिटाळ यांनी केले. प्रा. शिवाजी पोटभरे यांनी सूत्रसंचलन करुन आभार मानले.
lkj2im