शेवगाव । वीरभूमी - 09-Aug, 2023, 11:21 AM
विना परवानगी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकाच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पथकाच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालण्याची घटना शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील सारपे वस्ती नजीक घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिस पथकाने बाजुला उड्या मारुन आपला जीव वाचवला.
दरम्यान या पथकाने येथील अवैध वाळू साठ्यावर कारवाई करत 58 ब्रास वाळू साठा, वीना नंबरचे 3 डंपर, 3 ट्रॅक्टर ट्रॉली, दोन मोटरसायकली, एक स्कार्पिओ गाडी, एक जेसीबी (पळवून नेलेला) असा एकूण 67 लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.
लाला तमीज शेख व ऋषिकेश अर्जुन आहेर (दोघे रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा संशयतांची नावे आहेत. तर गोकुळ आठरे, सचिन विठ्ठल टोंगे (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) व नागेश बडधे (रा. जोहरापूर, ता. शेवगाव) हे फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व परीक्षाविधीन आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांना गुप्त खबर्याकडून सामनगाव परिसात अवैध वाळू उपसा चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस पथक तयार करून सोमवारी पहाटेच्या सुमारास सामानगावच्या शिवारात सारपे वस्ती परिसरात छापा टाकून ही कारवाई केली.
या दरम्यान यातील संशयित आरोपी लाला तमीज शेख याने महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ गाडी (क्र. एमएच 12, एनजी 2792) ही पोलीस पथकाच्या अंगावर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी बाजूला उड्या मारून जीव वाचविला. याप्रकरणी पाचही संशयितांवर शेवगाव पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार गणेश प्रभाकर गलधर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भादंवी कलम 307, 353, 379, 34 पर्यावरण संरक्षण अधिनियम 15, 3 खाण व खनिज अधिनियम 21, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई परीक्षाविधीन आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी, सपोनि. आशिष शेळके, पोहेकॉ. पांडुरंग वीर, पोना. आदिनाथ वामन, पोकॉ. एकनाथ गरकळ, पोकॉ. अस्लम शेख, पोकॉ. राहुल खेडकर, पोकॉ. वैभव काळे यांच्या पथकाने केली.
HoMqhujTOf