तिसगाव । वीरभूमी - 16-Aug, 2023, 06:44 PM
प्रवास करतांना चालत्या अॅपे रिक्षातून पडल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तिसगाव ते वृद्धेश्वर कारखाना प्रवासा दरम्यान घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव पुजा प्रकाश थोरात (वय 21, रा. आदिनाथनगर, ता. पाथर्डी) असे आहे.
घटनेनंतर रिक्षा चालक पसार झाला असून पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अॅपे रिक्षा ताब्यात घेतली आहे. महिलांना एसटी बसने 50 टक्के सवलत दिली असली तरी सध्या बस स्टॉपवरील गर्दी पाहुन एसटी दूर थांबवली जाते. यामुळे महिलांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. अवैध वाहतुकीने एका तरुणीचा बळी घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. त्यातच अधिक महिण्यांमुळे तिर्थस्थळी जाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी एसटी स्टॉपवर पहायला मिळते. त्यातच आज बुधवारी आमावस्या असल्याने श्रीक्षेत्र मढी, मायंबा येथे भाविकांची मोठी गर्दी होती.
आमावस्यानिमित्त दर्शनासाठी दूरवरुन महिलांसह भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत असल्याने बस स्टॉपवर महिलांची मोठी गर्दी असते. यामुळे अनेकवेळा बसमधील गर्दी व स्टॉपवरील गर्दी पाहुन एसटी चालक स्टॉपवर बस न थांबवता दूरवर थांबवतात. यामुळे महिलांना प्रवास करतांना अडचणीचा सामना करावा लागतो.
याचप्रमाणे मयत पुजा प्रकाश थोरात ही नेहमीप्रमाणे तिसगाव येथे कॉम्प्यूटरच्या शिकवणीसाठी गेली होती. शिकवणीनंतर आदिनाथनगर येथे आपल्या घरी येण्यासाठी ती एसटी बसची वाट पहात होती. मात्र बस स्टॉपपासून दूर थांबवली जात होती. तरी कधी गर्दीमुळे बसमध्ये चढता येत नव्हते.
तिसगाव ते आदिनाथनगर हे अंतर 4 किलोमीटरचे आहे. गर्दी व बस थांबत नसल्याने तिने अॅपे रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तोच प्रवास तिचा अखेरचा ठरला. गर्दीचा फायदा घेत रिक्षा चालकानेही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
तिसगाव ते आदिनाथनगर (वृद्धेश्वर कारखाना) दरम्यान अॅपे रिक्षाने प्रवास करत असतांना पुजा थोरात ही चालत्या रिक्षामधून पडल्याने तिचा जागेच मृत्यू झाला. चालकाने ताबडतोब रिक्षा थांबवून घटनेनंतर तेथून पलायन केले.
घटनेची माहिती कळताच पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रिक्षा ताब्यात घेत पंचनामा केला. मयत पुजा ही वृद्धेश्वर कारखान्याचे कर्मचारी प्रकाश थोरात यांची कन्या आहे. या दुदैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शेवगाव व पाथर्डी आगार व्यवस्थापकांनी एसटी चालकांना स्टॉपवर बस थांबविण्याच्या सुचना द्याव्यात तसेच गर्दी विचारात घेवून जास्तीची गाड्या पाठविण्याची मागणी होत आहे.
ycuMemDRYIshxU