रेणुकामाता मल्टीस्टेटच्या कर्मचार्यांचा बक्षिसरुपी गुणगौरव
तब्बल 51 लाखांच्या पुरस्कारांचे वितरण । अभिनेत्री किशोरी शहाणे यांची प्रमुख उपस्थिती
अहमदनगर । वीरभूमी- 12-Sep, 2023, 03:20 PM
प्रोत्साहनातून सर्वांचीच प्रगती होत असते. कलाकरांना देखील पुरस्कार मिळतात. मलाही उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नुकतेच दोन पुरस्कार मिळालेत, मात्र आयुष्याच्या या प्रवासात कधी इन्सेंटिव्ह मिळाला नाही म्हणून श्रीरेणुका माता मल्टीस्टेट जॉईन करावी असा मोह झाल्याची भावना प्रसिद्ध सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांनी येथे व्यक्त केली.
देशातील नऊ राज्यात 138 शाखांमधून तब्बल अडीच लाख कोटींची उलाढाल करणार्या श्रीरेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेतील उत्कृष्ठ कामगिरी करणार्या अधिकारी, कर्मचारी व शाखांचा वार्षिक गुणगौरव सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांचे हस्ते माऊली सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या गुणगौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे होते. यावेळी उत्कृष्ठ कामगिरी करणार्या परिवारातील सदस्यांना तब्बल 51 लाख रुपयांची रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले.
यावेळी अभिनेत्री किशोरी शहाणे म्हणाल्या, कोणत्याही क्षेत्रात कष्टाला पर्याय नाही. संस्था आपल्या कार्याची अशाप्रकारे दखल घेत असताना आपली जबाबदारी निश्चितपणे वाढते; इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशीच स्पर्धा करा, असा सल्ला देऊन संस्थेने अशा प्रकारे गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून इन्सेंटिव्ह देण्याची सुरू केलेली प्रथा निश्चीतपणे अद्वितीय आहे.
श्री रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याचा पायंडा पडला आहे. श्री रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेच्या सर्व शाखातील चौदाशे सेवकांपैकी निवड झालेल्यांना कमीत कमी पाच हजारापासून 71 हजारापर्यंत वैयक्तिक तर प्रथम आलेल्या पाथर्डी शाखेस एक लाख 51 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तर शेवगाव शाखेस एक लाख 21 हजार रोख, सन्मान चिन्ह, शाल पुष्पगुच्छ असा द्वितीय पुरस्कार तर 71 हजार रोख स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छा असा तृतीय पुरस्कार देऊन परळी शाखेस गौरविण्यात आले. तसेच बहुतेकांना पदोन्नतीची पारितोषिके बहाल करण्यात आली. त्यातून त्यांना वार्षिक वेतनवाढीच्या रूपाने दरमहा किमान तीन ते सात हजारांचा कायमचा लाभ होणार आहे. दिवाळी सारखा मोठा सण दोन महिन्यावर आला आहे. घवघवीत पारितोषीकाच्या माध्यमातून श्री रेणुकामाता मल्टिस्टेटच्या सेवकांची दिवाळी खर्या अर्थाने आजच झाली आहे.
याप्रसंगी संस्थेचे मुंबईचे सी. ए. धर्मेश शहा, दामु अण्णा काकडे, विष्णुपंत भालेराव, डॉ. वैभव अजमिरे, पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, माजी मुख्याध्यापक चंद्रकांत गळगट्टे, प्रा. उपेंद्र गळगट्टे, श्रीमंत घुले, रामदास गोल्हार, एस. के. जाखडे, राहुल जोशी, मंगलताई भालेराव, जयंती भालेराव, मनीषा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आदिनाथ महाराज शास्त्री यांचे मौन असल्याने त्यांनी डॉ. प्रशांत (नाना) भालेराव यांच्या मस्तकावर हात ठेवत उदंड आशिर्वादाच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके म्हणाले, सध्या सर्वत्र उद्दिष्टांचा जमाना आहे. श्री रेणुका माता मल्टीस्टेटची प्रगती उद्दिष्टपुर्ती मुळेच होत असल्याचा निर्वाळा दिला.
डॉ. प्रशांत भालेराव म्हणाले, संस्था चांगले काम करणार्या व उद्दिष्ट पूर्ण करणार्या सर्वांची दखल घेते तसेच चुका करणार्यांवर दंडात्मक कारवाई होते. संस्थेच्या मुशीत तयार झालेले अनेकजण आज मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेत उच्चपदी कार्यरत आहेत. संस्थेतील कर्मचार्यांना आतापर्यंत उपलब्ध असणार्या वैयक्तिक वैद्यकीय सेवेचा लाभ त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा देण्यात येईल. महिला कर्मचार्यांच्या बाळंतपणासाठी सेवेतून रजा सुविधा तसेच भविष्य निर्वाह निधीद्वारे राज्य व केंद्राची डबल पेन्शन योजना लागू होणार असल्याचे निर्णय जाहीर केले. तेव्हा सर्व सेवकवृंदांनी टाळ्याच्या गजरात निर्णयांचे स्वागत केले.
माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले, हजारो शिंपल्यात एखादा मोती निघतो, तसे लक्षावधी माणसातून नानांसारखा एखादाच कर्तृत्वान माणूस उदयास येतो. श्रीरेणुकामाता संस्थेचे मालक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सारखा अलौकिक सुसंवाद मला अन्यत्र आढळला नाही. हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, अर्थतज्ञ डॉ. भालेराव यांनी श्रीरेणुकामाता मल्टीस्टेट परिवारात कौटुंबिक भावना निर्माण केल्याने सर्वांनीच जीव ओतून काम करून संस्था नावारूपाला आणली आहे. यावेळी माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, राजेंद्र बच्छावत, ज्येष्ठ पत्रकार संदीप रोडे, पत्रकार वसंतराव झावरे, कृषी उपसंचालक परीक्षा उत्तीर्ण झालेले पवन नजन, संस्थेचे कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र मोरे यांचीही भाषणे झाली.
प्रारंभी दीपप्रज्वलन करून श्री रेणुका माता व स्व. चंद्रकांत दादा भालेराव व स्व. योगेश भालेराव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन विणा दिघे यांनी केले तर अॅड. गणेश शेंडगे यांनी आभार मानले.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अॅड. नितीन भालेराव, उपाध्यक्ष पांडुरंग देवकर, प्रशासकीय अधिकारी कार्तिक, दिनेश टकले, अतुल इथापे, पोपट काळे, सरव्यवस्थापक राजेंद्र नांगरे, अश्वलिंग जगनाडे, गणेश गाढे यांनी विशेष परिश्रम घेतले.
LlqeQCOj