शिर्डी । वीरभूमी - 13-Sep, 2023, 10:52 AM
शिर्डी येथील हेलिपॅड रोड 11 नंबर चारी येथे चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असतांना पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 45 गॅस टाक्यासह तब्बल सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील हेलिपॅड रोड, 11 नंबर चारी येथे चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांना समजली. या माहितीची खातरजमा करुन पोलिस उपअधिक्षक मिटके यांनी राहाता तहसीलदार अमोल मोरे यांना संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी राहाता तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक भारत खरात यांना संयुक्त कारवाई करण्याकरीता पाठवले.
त्यावर सदर ठिकाणी पथकातील कर्मचारी पाठवून पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 35 घरगुती गॅस टाक्या तसेच 10 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत.
तसेच संदीप पांडुरंग मते (वय 39, रा. कातोरे वस्ती, निमगाव, ता. राहाता), अनिस मोहम्मद सय्यद (वय 48, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता) व विवेक राजेंद्र आव्हाड (रा. चांगदेवनगर, निमगाव, ता. राहाता) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने, गॅस टाक्या, मशीन असा एकूण 7 लाख 7 हजार 95 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3, 7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, पोनि. गुलाबराव पाटील, पुरवठा निरीक्षक भारत खरात, पोहेकॉ. इरफान शेख, पोकॉ. अशोक शिंदे, पोकॉ. दिनेश कांबळे, पोहेकॉ. आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.
YEvcGRxsrfSMd