अकोलेच्या नगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे?
नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जामेवर निवड । अधिकृत घोषणा 27 सप्टेंबर रोजी
अकोले । वीरभूमी - 21-Sep, 2023, 10:45 PM
अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांची निवड निश्चित आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. नगरपंचायतीवर माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपने 17 पैकी 12 जागा जिंकुन निर्विवाद बहुमत मिळविले होते. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुले आहे. त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे नगराध्यपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते मात्र नगराध्यक्षपदाची माळ भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांच्या गळ्यात पडली.
नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी 4 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार प्रांताधिकारी शैलेश हिंगणे यांच्या उपस्थितीत सत्तारूढ भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाळासाहेब वडजे, नगरसेवक शरद नवले, हितेश कुंभार, विजय पवार, सागर चौधरी, सौ.शितल वैद्य, सौ.प्रतिभाताई मनकर, सौ.वैष्णवी धुमाळ, सौ.कविता शेळके, सौ.तमन्ना शेख, सौ.माधुरी शेणकर, सौ.जनाबाई मोहिते, विरोधी गटाचे नगरसेवक नवनाथ शेटे, आरिफ शेख, श्वेताली रुपवते, प्रदिप नाईकवाडी यांची बैठक नगरपंचायत सभागृहात दुपारी पार पडली.
तत्पूर्वी माजी आमदार वैभवराव पिचड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अ.ता. एज्यु सोसायटीचे अध्यक्ष इंजि. सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, माजी सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी भाजप कडून माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांचा एकमेव अर्ज मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून नगरसेविका शितल अमोल वैद्य यांची तर अनुमोदक म्हणून नगरसेवक शरद नवले यांची स्वाक्षरी आहे.
सत्तारूढ भाजपच्या सर्व नगरसेवकांची नगराध्यक्ष निवडी संदर्भात माजी आमदार वैभवराव पिचड व पदाधिकारी यांनी काल मते जाणून घेतली. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्याशी विचार विनिमय करून आज सकाळी अमृतसागर दूध संघाच्या सभागृहात पिचड व पक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पक्षाचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी बाळासाहेब वडजे यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख यांची भाषणे झाली. व पक्षाच्या वतीने काही सूचना देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी यांचे सासरे अंबादास नाईकवाडी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी आमदार व भाजपाचे नेते वैभवराव पिचड म्हणाले, मागील काळात आपल्या पक्षाचे सरकार नसल्याने नगरपंचायतला निधी आणण्यास अडचणी येत होत्या. आता आपल्या पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यामातून नगरपंचायतसाठी भरपूर निधी आणता येणार आहे. त्यामुळे आलेला निधी लवकर खर्ची करा, लोक समाधानी होत नाही तोपर्यत आपण समाधानी राहता कामा नये, अशा सुचना करुन बाळासाहेब वडजे तुम्ही आता नगराध्यक्ष म्हणून शहर विकासाचे कामास जोमाने सुरुवात करा, असेही त्यांनी सूचित केले.
बाळासाहेब वडजे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे. अधिकृत रीत्या 27 तारखेला निवड जाहिर होणार आहे. आता सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष वडजे आपण शहर विकासाच्या कामाला लागा तसेच शहरातील मतदार याद्या चेक करा, नविन मतदारांची नोंदणी करुन घेउन लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु करा.स्वातंत्र्य लढ्याचा व महात्मा गांधीचा शांतीचा, अंहिसेचा मार्ग जगाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवत आहे.
काल संसदेत देशतील महिलांचा सन्मान करणारे अर्थात महिलांना राजकिय आरक्षण देणारे विधेयक आपल्या पक्षाने व पंतप्रधान नरेद्र मोदीनी पास केले आहे. आपल्या पक्षाचे दूरदृष्टी काम पुढील काळात दिसून येईल. महिलांना दिलेली संधी हि आपल्या भाजपाने, पंतप्रधान मोदीनी दिली आहे याची माहितीही ग्रामीण भागातील महिलांपर्यत पोहचली पाहिजे यासाठी सरळ अॅप सामान्य माणसांपर्यत पोहचवण्याचे काम करा. मेरी माती मेरा देश हा केंद्र सरकारने घेतलेला उपक्रम असुन प्रत्येकाने यात योगदान द्यावे.
सध्याच्या काळात गणपती महोत्सव सुरु आहे. अनेक मंडळानी गणेश स्थापना केली आहे. अश्या प्रत्येक वार्डात गणपती मंडळाजवळ कलश ठेवून मेरी माती मेरा देश अंतर्गत माती गोळा करावे. देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत व महाराष्ट्र राज्यात आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता व तालुक्यात आपला भाजपाचा आमदार व्हावा हे प्रत्येकाला वाटते. तर त्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सामान्य माणसापर्यत पोहचवले पाहिजे. पक्षाचे प्रत्येक उपक्रमांत सहभागी व्हावे अश्या सुचना वैभवराव पिचड यांनी केल्या.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी सरळ अॅप, मेरी माती मेरा देश सह पक्षाचे विविध उपक्रमांची माहिती देवून आपला तालुका प्रत्येक उपक्रमात सर्वात पुढे ठेवा देशाचे गृहमंत्री व देशाचे पक्षाचे अध्यक्ष आपल्या वैभव भाऊची उमेदवारी अर्ज घेऊन अकोल्यात येतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, नगरसेवक हितेश कुंभार, बबलू धुमाळ, परशराम शेळके यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी अगस्ति कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र डावरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सावंत, मच्छिंद्र मंडलिक, सचिन जोशी, अमोल वैद्य, बबलू धुमाळ, माजी नगरसेवक सचिन शेटे, परशराम शेळके, मोहसिन शेख, रविंद्र शेणकर, खरेदी विक्री संघाचे संचालक नानासाहेब नाईकवाडी, निलेश देशमुख, डॉ. विराज शिंदे, सोपानराव देशमुख, रमेश नाईकवाडी, अनिल गायकवाड, अशोक शेणकर, विकास देशमुख, भिमा देशमुख आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी ज्येष्ठ जेते रमेश राक्षे यांनी आभार मानले.
Comments