अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात चोरी करणारे चोरटे जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी । आरोपी पाथर्डी तालुक्यातील
अहमदनगर । वीरभूमी - 22-Sep, 2023, 10:57 PM
मागील महिण्यात श्रीक्षेत्र अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात चोरी करणारे तीन चोरटे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला महिनाभरानंतर यश आले आहे. अटक केलेले चोरटे हे पाथर्डी तालुक्यातील असून त्यांच्याकडून 7 लाख 19 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत तब्बल 22 गुन्हे उघडकीस आले आहेत.
मंदिरात चोरी करणारे सराईत असून त्यांनी शेवगाव, पाथर्डीसह तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प, श्रीरामपूर, संगमनेर, घारगाव, राजूर, नेवासा, शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत. चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल श्रीक्षेत्र अमरापूर येथील रेणुकामाता मंदिराच्या सभामंडपामध्ये तपासी अधिकारी व कर्मचार्यांचा आज शनिवार दि. 23 रोजी सन्मान करण्यात येणार आहे.
मागील महिण्यात 18 ऑगस्ट 2023 रोजी श्रीक्षेत्र अमरापूर येथील रेणुकामाता मंदिराचे दरवाजाचे कुलूप तोडून देवीचे अंगावरील तब्बल 16 लाख 67 हजार 400 रुपये किंमतीचे विविध प्रकारचे दागिणे चोरुन नेले होते. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती समजली की, अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात चोरी ही पाथर्डी तालुक्यातील हात्राळ सैदापूर येथील गणपत केदार याने इतर साथीदारासह केली असून चोरी केलेले मंदिरातील सोन्या चांदीची दागिणे व आभुषण शेतात पुरुन ठेवलेले आहे. आता गेल्यास मिळून येईल, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून पंचासमक्ष कारवाई करण्याचे आदेश दिले.
या आदेशानंतर पथकाने लागलीच पाथर्डी तालुक्यातील हात्राळ सैदापूर येथे जावून संशयीत गणपत कुंडलिक केदार याचा ठावठिकाणाबाबत माहिती घेवून तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वासात घेवून सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्याने अजय छबू चव्हाण, जॅकसन उर्फ किशोर पुंजाराम जाधव (दोघे रा. माळीबाभूळगाव, ता. पाथर्डी) व दोन अल्पवयीन बालकांना सोबत घेवून गुन्हा केल्याची कबुले देवून शेतात पुरलेले मंदिरातील चोरी केलेले सोन्या-चांदीचे आभुषण काढून दिले.
पोलिसांनी मुद्देमालासह त्याला ताब्यात घेत दोन अल्पवयीन मुलांसह अजय छबू चव्हाण, जॅकसन उर्फ किशोर पुंजाराम जाधव (दोघे रा. माळीबाभूळगाव, ता. पाथर्डी) यांनाही शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपींना आणखी कोठे कोठे गुन्हे केले याबाबत विचारपूस केली असता जिल्ह्यात तब्बल 22 ठिकाणी गुन्हे केल्याचे उघडकिस आले आहेत.
पोलिसांनी आरोपीच्या कब्जातून 5 लाख 44 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे, नाग, पत्रा, नथ, 50 हजार रुपये किंमतीची पॅशन प्रो मोटार सायकल व 1 लाख 25 हजार रुपये रोख रक्कम असा 7 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगावचे उपविभागिय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दनेश आहेर यांनी सपोनि. हेमंत थोरात, पोसई. तुषार धाकराव, पोसई. सोपान गोरे, सफौ. भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ. दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, अतुल लोटके, पोना. रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, संतोष लोढे, सचिन अडबल, विजय ठोंबरे, भिमराज खर्से, संदीप चव्हाण, संतोष खैरे, गणेश भिंगारदे, पोकॉ. मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, मपोना. भाग्यश्री भिटे, चापोहेकॉ. संभाजी कोतकर, उमाकांत गावडे, भरत बुधवंत व अरुण मोरे यांच्या पथकाने केली.
श्रीक्षेत्र अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरातील चोरीचा तपास करत असतांना मागील महिण्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या आठ मंदिरात चोर्या करणारे चोरटे जेरबंद केले होते. तर आता या चोरट्यांनी तब्बल 22 ठिकाणी केलेले गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कामगिरीबद्दल शनिवार दि. 23 रोजी अमरापूर येथील रेणुकामाता मंदिराच्या सभागृहात तपासी अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
Comments