पारनेर । वीरभूमी - 24-Sep, 2023, 01:30 PM
पारनेर तालुक्यातील अनेक धनगर बांधव आपल्या पारंपरिक मेंढपाळ व्यवसायासाठी बाहेर फिरत असतात. त्यावेळी त्यांना ऊन, वारा, पावसापासून कोणतेही संरक्षण नसते. गावाकडेही याच असुविधांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यासाठी आगामी अधिवेशनात मेंढपाळ बांधवांच्या घरकुलांचा प्रश्न उपस्थित करून तो सत्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आ. निलेश लंके यांनी सांगितले.
ढवळपुरी येथील तीन कोटी रूपये किमतीच्या विकास कामांचे भुमिपुजन तसेच 500 मेंढपाळ बांधवांना ताडपत्र्यांचे आ. निलेश लंके यांंच्या हस्ते वितरण करण्यात आले, त्यावेळी आ. लंके हे बोलत होते. अशोक कटरिया हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, धनगर समाजाच्या अडचणी, दुःख काय आहेत हे मी अतिशय जवळून पाहिले आहे. आठ आठ महिने आमचे धनगर बांधव गावापासून दुर जाऊन मेंढपाळ व्यवसाय करीत असतात. उन, वारा, पावसापासून संरक्षणाची त्यांची तिथे सोय नसते. गावाकडे आल्यानंतरही तशाच असुविधांशी त्यांना सामना करावा लागतो. चेअरमन भागाजी गावाडे, अशोक कटारिया यांनी मेंढपाळ बांधवांच्या या असुविधांविषयी आपल्या भाषणात चांगला मुद्दा उपस्थित केला.
या धनगर बांधवांच्या घरकुलासंदर्भात आगामी अधिवेशनात प्रश्न मांडून तो धसास नेण्यासाठी पाठपुरावा करीत तो सत्यात उतरविण्याचे काम आपण करणार आहोत असे ते म्हणाले. मला अनेकदा धनगर बांधवाचा फोन येतो, आमची बकर चारीत असताना शेतकर्याने दोन कोकरू उचलून नेले, मारहाण केली. तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा, सरपंचाला फोन करण्याचे साकडे घातले जाते. त्याच वेळी आपण सबंधित गावातील सरपंचाचा शोध घेऊन माझ्या बांधवांना मदत करण्याबाबत व्यवस्था करतो. पोलीस ठाण्यास फोन करून मदत करण्याबाबत सुचना करण्यात येत असल्याचे लंके यांनी सांगितले.
ढवळपुरीमधील काही रस्त्यांची कामे शेत पानंदमधून मार्गी लावण्यात आलेली आहेत. उर्वरीत रस्त्यांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. 19 वाडयांपैकी फक्त पाच वाडयांमध्ये काम झाल्याचे सांगणारे भागाजी गावडे हे हुशार चेअरमन आहेत. तालुक्याच्या आमदाराचीही ते दिशाभूल करीत आहेत. अर्थात दिशाभुल करण्यामागचा हेतू माझ्या गावाला अधिकचा निधी कसा मिळेल, माझ्या समाजबांधवांच्या पदरात काहीतरी पडले पाहिजे असा उदात्त आहे.
विद्यार्थ्यांना सायकल वाटप करतानाही भागाजी गावडे व सुखदेव चितळकर यांनी दोन स्वतंत्र याद्या देत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सायकलचा लाभ मिळवून दिला.दिवाळीनिमित्त अजूनही गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरण करण्यात येईल असे आश्वसन आ. लंके यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे, माजी सभापती सुदाम पवार, ठकाराम लंके, अॅड. राहुल झावरे, दत्ता कोरडे, प्रा. संजय लाकुडझोडे, अरूण पवार, बबन आडसुळ, विजय सासवडे, विकास भागवत, संजय काळे, प्रसाद नवले, विकास शेटे, सरपंच नंदा गावडे, भागाजी गावडे, सुखदेव चितळकर, रमेश केदारी आदी उपस्थित होते.
sLcSbarkDlQCV