न्यायालयाकडून पाच जणांना दोन वर्षाचा सश्रम कारावास । प्रत्येकी पाच हजाराचा दंड
पाथर्डी । वीरभूमी - 28-Sep, 2023, 02:31 AM
पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथे शेताचा सामाईक बांध फोडून शेतात अतिक्रमण करू नका, असे समजावून सांगणार्या फिर्यादी महिलेला व तिचा दोन मुलांना मारहाण करून हाताला चावा घेवून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्ह्यातील 5 आरोपींना न्यायालयाने 2 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 5000 पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथील फिर्यादी जिजाबाई भाऊसाहेब माने व आरोपी राजेंद्र वासुदेव माने, भागवत राजेंद्र माने, अर्जुन राजेंद्र माने, मुक्ताबाई राजेंद्र माने, रंजना वासुदेव माने यांची शेजारीशेजारी शेतजमीन असून दिनांक 12/10/2015 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी जिजाबाई भाऊसाहेब माने व त्याने दोन मुले यांच्या शेताचा सामाईक बांध कोरत होते. त्यास फिर्यादी व तिच्या मुलांनी विरोध केला असता आरोपी राजेंद्र माने याने फिर्यादी जिजाबाई माने यांच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेवून बोट तोडून टाकले.
तसेच फिर्यादीचा मुलगा नारायण माने याचे डावे हाताला आरोपी रंजना माने हिने चावा घेतला. तर आरोपी अर्जुन माने याने फिर्यादीचा मुलगा नवनाथ माने याचे उजवे हाताचे अंगठ्यास चावा घेतला व डोक्यात मारहाण करून लाथाबुक्क्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते.
याबाबत फिर्यादी जिजाबाई माने यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलिस ठाण्यात वरील पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल फिर्यादीच्या अनुशंगाने पोलिसांनी तपास करून न्यायाधीश व्ही. आय. शेख यांच्या न्यायालयात खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले.
फिर्यादी व तिच्या दोन मुलांना आरोपींनी चावा घेवून गंभीर जखमी केले. प्रकरणी न्यायाधीश व्ही. आय. शेख यांनी पाचही आरोपींना दोषी धरत दोन वर्ष सश्रम कारावास तसेच प्रत्येकी पाच हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिना सक्त मजुरी तसेच फिर्यादीला पाचही आरोपींनी मारहाण करून जखमी केले.
याबाबत आरोपींना 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली असून आरोपीला करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेतून फिर्यादीला 20 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. या दोनही तुरुंगवासाच्या शिक्षा सोबत भोगायच्या आहेत. सरकारी वकील नितीन भिंगारदिवे तसेच सरकारी वकील प्रज्ञा गीते यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.
IZKGqUajWsPwOHvJ