निकृष्ट कामांविरोधात शिवसेनेचा मध्यरात्रीच ठिय्या
रात्री सुरु केलेले निकृष्ट दर्जाचे शेवगाव - भगूर रस्ताकाम बंद पाडले । शिवसेनेचे मध्यरात्री आंदोलन
शेवगाव । वीरभूमी - 09-Oct, 2023, 11:42 AM
शेवगाव ते भगूर रस्त्याच्या कामाला कार्यारंभ देवून वर्ष होत आले तरी संबधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना शिंदे गटाने दि. 12 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशार्यानंतर संबधित ठेकेदाराने या कामाला घाईघाईने रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास प्रारंभ केला. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समजताच शिवसेना शिंदे गटाने तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे यांच्या नेतृत्वात काम सुरु असलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत हे काम बंद पाडले. यावेळी शिवसेना पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठेकेदार व ठेकेदाराला पाठीशी घालणार्या प्रशासनाचा निषेध केला.
शेवगाव शहरातील क्रांती चौक ते भगूर पर्यंतच्या रस्ता कामाला कोट्यावधीचा निधी वर्षभरापूर्वी मंजूर झाला होता. या कामाचा कार्यारंभ आदेशही ठेकेदाराला मिळाले होते. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडून लांबवले जात होते. यामुळे या रस्त्यावर पडलेली मोठमोठी खड्ड्यांतीन मार्ग काढतांना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना शिंदे गटाचे शेवगाव तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे यांनी निवेदनाद्वारे दि. 12 ऑक्टोबर रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशार्यानंतर संबधित ठेकेदाराने रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली.
संबधित ठेकेदाराची यंत्रणा रविवारी रात्री शेवगावात दाखल होत रस्त्यावर खडी टाकून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे यांना समजली. त्यांनी तात्काळ युवा शिवसेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट, विशाल परदेशी, सोमनाथ कुरुंद, वैभव लांडे, मुज्जामिल शेख, आसीफ पठाण, अक्षय खोमने या शिवसेना पदाधिकार्यासह रस्ता काम सुरु असलेल्या ठिकाणी येवून पहाणी केली असता रस्त्यातील खड्डे थातूर-मातूर बुजवून त्यावरुन लागेच डांबरीकरण करण्यास सुरुवात केली जात होती. मात्र हे काम निकृष्ट असल्याचे लक्षात येताच रस्ताकाम बंद करण्याची मागणी केली. मात्र रस्ताकाम होत नसल्याचे पाहुन डहाळे व त्यांच्या सहकार्यांनी रस्ता काम सुरु असलेल्या खड्ड्यातच ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाडले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आशुतोष डहाळे म्हणाले की, क्रांती चौक ते भगूर या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र संबधित ठेकेदाराने शेवगावकरांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी या रस्त्याचे काम रात्री सुरु करुन थातूर-मातूर पूर्ण करण्याचे चालवले होते. हे काम शेवगावकरांच्या समाधानासाठी नसून अधिकार्यांच्या समाधानासाठी केले जात आहे.
वाहतुकीचे कारण देवून हे काम रात्री सुरु केल्याचे सांगितले जाईल. मात्र दिवस-रात्र या रस्त्याचा त्रास शेवगावकरांना सहन करावा लागत आहे. ठेकेदार हे काम शेवगावकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहे. मात्र शिवसेना ही धूळफेक होवू देणार नाही. ठेकेदाराने हे काम दर्जेदार करण्याच्या मागणीसाठी रात्रीच हे काम आम्ही बंद पाडले असल्याचे आशुतोष डहाळे यांनी सांगितले.
निकृष्ट कामांकडे सार्वजनिक बांधकामचे सोईस्कर दुर्लक्ष शेवगाव तालुक्यातील रस्त्याच्या कामांसाठी कोट्यावधींचा निधी दरवर्षी मंजुर केला जातो. या निधीतून रस्त्यांची कामेही केली जातात. मात्र हे तयार केलेले रस्ते सहा महिण्यात जैसे थे होतात. एकदा निधी मिळाला तर पुन्हा किमान सात-आठ वर्षे त्या रस्त्यासाठी निधी मिळत नाही. रस्त्याचे काम करत असतांना ते इस्टिमेटप्रमाणे केले जात नाही. डांबर कमी प्रमाणात वापरले जाते. मुरुम ऐवजी मातीमिश्रीत मुरुम वापरला जातो. काही ठिकाणीतर फक्त खड्डे बुजवून त्यावर डांबरीकरण केले जाते. परिणामी पहिल्या पावसातच रस्त्यावरील डांबरीकरण वाहुन जात तेथे पुन्हा खड्डा पडतो. तालुक्यातील अनेक रस्त्यांची अशी अवस्था असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सोईस्कर डोळेझाक करते.
weACyikfHg