पाथर्डी । वीरभूमी - 09-Oct, 2023, 10:41 PM
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी वाहतूकदार व मुकादम संघटनेने दरवाढीसह विविध मागण्यांसाठी संप पुकारला. या संपात साखर कारखानदार असलेल्या आमदार मोनिका राजळे यांना सहभागी करून घेण्यात मुंडे समर्थकांना यश आले असून मुंडे-राजळे यांच्यामध्ये ताणलेल्या राजकीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजळे यांची संपामधील एंट्री राजकीय अभ्यासकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.
आज दुपारी आमदार राजळे यांच्या पाथर्डी येथील निवासस्थानी संघटनेची बैठक निमंत्रित मुकादमांसमवेत झाली. यावेळी संघटनेचे कोषाध्यक्ष गोरक्ष रसाळ, प्रदेश सचिव सुरेश वनवे, बीड जिल्हाध्यक्ष कृष्णा तिडके, नगर जिल्हाध्यक्ष भीमराव पालवे, तालुकाध्यक्ष पिराजी कीर्तने, यासह धनंजय बडे, माणिक बटुळे, माणिक खेडकर, अशोक खरमाटे, बाळासाहेब गोल्हार, महादेव जायभाय आदींसह तालुक्यातील निवडक मुकादम व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपाची घोषणा झाली असली तरी दरवाढी शिवाय अन्य कोणत्याही मागण्यांचा मसुदा जाहीर करण्यात आलेला नाही. बैठकीचा एकूण सूर पाहता आमदार मोनिका राजळे यांना संपात उतरवून संपाचे रणांगण पाथर्डी तालुक्यात करण्याविषयीच्या रणनीतीचा भाग पुढे आला आहे. तालुक्यात तोडणी कामगारांची मोठी संख्या व पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने संपाचा प्रभाव वाढवणे संघटनेला शक्य होणार आहे.
गेल्या 30 तारखेला तालुक्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंकजा यांची भेट घेऊन संपाविषयी चर्चा केली. सर्वप्रथम त्यांनी, आमदार राजळे आपल्याबरोबर याव्यात यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली. पंकजा यांचे बरोबर आपले संबंध सर्वसामान्य असल्याचे दाखवण्यासाठी आमदार राजळे यांनी तात्काळ संमती दिली. मुंडे यांच्याकडे जाऊन तालुक्यातील काही कार्यकर्ते आ. राजळे यांच्या कार्यशैलीबाबत तक्रारीचा सूर अळवत होते. त्यांनाही संपात सहभागी होऊन आ. राजळे यांनी उत्तर दिले आहे.
मुकादम बैठकी पुढे बोलताना आ. राजळे म्हणाल्या, जेवढी ताकद गोपीनाथ मुंडे यांची होती तेवढीच ताकद लोकनेते पंकजा मुंडे यांची असल्याने संप निश्चितच यशस्वी होणार आहे. सर्वांनी एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही. यंदा दुष्काळी परिस्थिती असून गाळप हंगाम कमी कालावधीचा असणार आहे. राज्य शासन, साखर आयुक्तालयाबरोबर चर्चा करून मार्ग निघू शकेल. संप हा शेवटचा पर्याय ठरू शकतो. पंकजाताईंनी संपाबाबत काहीही निर्णय घ्यावा त्यांचे बरोबर राहून तालुक्याची ताकद दाखवून देऊ.
बैठकीचे प्रास्ताविक संजय कीर्तने सूत्रसंचालन, वामन कीर्तने, तर सतीश खेडकर यांनी आभार मानले.
कुरघोडीच्या राजकारणाला संपाचे माध्यम लाभदायक : पंकजा मुंडे यांना संपाच्या माध्यमातून शासनाला ताकद दाखवून द्यायची असून आगामी निवडणुकांसाठीची मोर्चे बांधणी कशी असेल याचा अंदाज संपातून येणार आहे. वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटीची आलेली नोटीस, भाजपमधील कुरघोडीचे राजकारण, याला शह देण्यासाठी संपाचे माध्यम लाभदायक ठरेल, असा विश्वास मुंडे समर्थकांना वाटतो.
Comments