नमो शेतकरी महासन्मान योजनेला निधी मंजुरी
मुंबई । वीरभूमी - 11-Oct, 2023, 10:15 AM
राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीतील हप्त्यापोटी 1720 कोटी निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकर्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा तत्कालिन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे प्रतिवर्ष 6000 रुपये अनुदान देणार आहे.
मागील काही बदलत्या राजकीय घडामोडीनंतर कृषीमंत्री म्हणुन धनंजय मुंडे यांनी शपथ घेतल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट 2023 मध्ये देण्याची घोषणा केली होती. मात्र निधीची तरतूद न झाल्याने तो हप्ता शेतकर्यांना अद्याप मिळालेला नाही.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला 2000 रुपयेचा हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी 1720 कोटी रुपये निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लाभार्थी शेतकर्यांना लवकरच एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीतील पहिला हप्ता 2000 रुपये प्रमाणे बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 ऑक्टोबरपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे समजते. तसेच ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 दुसरा हप्ता पुढील महिण्यात जमा करण्यात येणार असून तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च अखेर देणे प्रस्तावित आहे.
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीचे वितरण हे पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
TAaQOVNnDf