प्राथमिक शिक्षकांचा करून बी.एल.ओ, केला शैक्षणिक गुणवत्तेच्या आयचा घो..!
आम्हाला शिकवू द्या । शिक्षकांची आर्त हाक, महसूल प्रशासन मात्र दाखवते कायद्याचा धाक
रविकिरण साळवे । वीरभूमी - 24-Oct, 2023, 09:31 AM
राहुरी : शिक्षक हक्क कायदा 2009 कलम 27 नुसार प्राथमिक शिक्षकांना दशवार्षिक जनगणना,आपत्ती व्यवस्थापन व प्रत्यक्ष निवडणुकीचे कामकाज या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही प्रकारचे अशैक्षणिक काम देण्यात येऊ नये अशी तरतूद असताना सुद्धा अहमदनगर जिल्हा महसूल प्रशासनाकडून जिल्हाभरातील अनेक प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ.या अशैक्षणिक कामकाजाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. बी.एल.ओ. कामकाज म्हणजे घरचं खाणे आणि लष्कराच्या भाकर्या भाजणे. अशातला प्रकार असून या पदावर काम करताना वर्षभर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे माहिती अहवाल महसूल विभागामार्फत निवडणूक आयोगाला द्यावे लागतात.
सदर कामकाजांतर्गत नवीन मतदार नोंदणी करणे. स्थलांतरित व मयत झालेले मतदार वगळणे. मतदार याद्या अद्यावत करणे. मतदार यादीच्या संदर्भाने वर्षभर सातत्याने मतदार यादीचा आढावा घेणे. निवडणूक ओळखपत्र वाटणे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना घरोघरी जाऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करणे इत्यादी कामे करावी लागतात.
नुकताच दोन महिन्यांपूर्वी घरोघर जावून सर्व्हे झाला. हा घरोघर सर्व्हे म्हणजे विद्यार्थी वार्यावरी आणि गुरुजी फिरे दारोदारी अशी परिस्थिती संपूर्ण जिल्हाभर दिसून आली. सदरचे काम करत असतांना शिक्षकांचे अनेक कामाचे तास वाया गेले. मतदार याद्या पुनरनिरीक्षण ही वर्षानुवर्षे सतत चालणारी प्रक्रिया असल्यामुळे वर्षभर अनेक शिक्षक यात गुंतलेले आहेत. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झालेला दिसून येतो.जाणून बुजून शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवून प्राथमिक शिक्षक व जिल्हा परिषदेच्या शाळा बदनाम करण्याची हे षडयंत्र असून स्थानिक पातळीवर शिक्षकांना पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
राहुरी तालुक्यात अनेक महिला शिक्षिका व दिव्यांग शिक्षकांना त्यांच्या शाळेपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरील अवैध व्यवसाय असणार्या झोपडपट्टी भागात बी. एल.ओ. म्हणून नेमणूका दिलेल्या आहेत. महिला शिक्षिकाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. अशा भागात महिलांना जीव मुठीत धरून कामकाजासाठी जावे लागते. कामकाजा दरम्यान महिला शिक्षिकाबाबत काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न महिला शिक्षिका विचारत आहेत.
त्यामुळे महिला शिक्षिका, दिव्यांग शिक्षक, ग्रेड मुख्याध्यापक तसेच 50 वर्ष वयावरील कर्मचारी, गंभीर आजार असणारे कर्मचारी, द्विशिक्षकी शाळेवरील मुख्याध्यापक यांना बी.एल.ओ. कामकाजातून वगळावे यासाठी अनेक वेळा शिक्षक संघटनांनी तहसीलदार राहुरी यांच्याशी निवेदनाद्वारे शिक्षकांना वगळण्याची विनंती केली परंतू तहसील कार्यालयाकडून सदर निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.त्यामुळे सर्व शिक्षक संघटना भविष्यात राहुरी तालुक्यासह जिल्हाभरात मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.
बीएलओ नेमणूका करताना भारत निवडणूक आयोगाने 1) शिक्षक 2) अंगणवाडी सेविका, 3) पटवारी/अमीन/लेखपाल, 4)पंचायत सचिव, 6) ग्रामस्तरीय कामगार, 6) वीज बिल वाचक, 7)पोस्टमन, 8) सहायक परिचारिका आणि मिड-वाइफ, 9) आरोग्य कर्मचारी, 10) मध्यान्ह भोजन कर्मचारी, 11) कंत्राटी शिक्षक, 12) कॉर्पोरेशन टॅक्स कलेक्टर आणि 13) शहरी भागातील लिपिक कर्मचारी अशा 13 प्रकारच्या कर्मचार्यांची नेमणूक करता येऊ शकते असे निर्देश दिले असताना सुद्धा अहमदनगर जिल्ह्यात बी.एल.ओ. म्हणून मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. हे कामकाज करत असताना महसूल प्रशासनाचे अधिकारी शिक्षकांवर दबंगगिरी करताना दिसतात.
काम करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून लोकप्रतिनिधी कायद्याचा शिक्षकांना धाक दाखविला जातो. कामकाजात मागे पडल्यास लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत नोटिसा पाठवल्या जातात. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यातील बी.एल.ओ. नेमणूका करतांना मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या नेमणूका केलेल्या दिसून येतात. मार्च 2022 च्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 3700 बी.एल.ओ. पैकी 3221 शिक्षक व 521 इतर विभागातील कर्मचार्यांना नेमणूका दिलेल्या आहेत. या माहितीतून बी.एल.ओ. नेमणुकीचे शिक्षकांशी शेकडा प्रमाण 86.53 टक्के असल्याचे दिसून येते.
अहमदनगर जिल्ह्यात पुढीलप्रमाणे मतदार संघ निहाय कर्मचारी बी.एल.ओ. म्हणून नेमण्यात आले आहेत. अकोले - एकूण बी. एल.ओ. 307 पैकी शिक्षक 301, अंगणवाडी सेविका 0, आरोग्य सेविका 0, महसूल विभाग 0, ग्रामपंचायत कर्मचारी 6, महानगरपालिका कर्मचारी 0, नगरपालिका कर्मचारी 0. संगमनेर - एकूण बी. एल.ओ. 278 पैकी शिक्षक 190, अंगणवाडी सेविका 1, आरोग्य सेविका 1, महसूल विभाग 0, ग्रामपंचायत कर्मचारी 86, महानगरपालिका कर्मचारी 0, नगरपालिका कर्मचारी 0 . शिर्डी - एकूण बी. एल.ओ. 270 पैकी शिक्षक 205, अंगणवाडी सेविका 0, आरोग्य सेविका 0, महसूल विभाग 0, ग्रामपंचायत कर्मचारी 18, महानगरपालिका कर्मचारी 0, नगरपालिका कर्मचारी 47.
कोपरगाव - एकूण बी. एल.ओ.269 पैकी शिक्षक 245, अंगणवाडी सेविका 0, आरोग्य सेविका 0, महसूल विभाग 0, ग्रामपंचायत कर्मचारी 24, महानगरपालिका कर्मचारी 0, नगरपालिका कर्मचारी 0 . श्रीरामपूर - एकूण बी. एल.ओ.310 पैकी शिक्षक 275, अंगणवाडी सेविका 0, आरोग्य सेविका 0,महसूल विभाग 0, ग्रामपंचायत कर्मचारी 16, महानगरपालिका कर्मचारी 19, नगरपालिका कर्मचारी 0 .
नेवासा - एकूण बी. एल.ओ.269 पैकी शिक्षक 254, अंगणवाडी सेविका 0, आरोग्य सेविका 0, महसूल विभाग 2, ग्रामपंचायत कर्मचारी 12, महानगरपालिका कर्मचारी 0, नगरपालिका कर्मचारी 1. शेवगाव-पाथर्डी - एकूण बी. एल.ओ.361 पैकी शिक्षक 360, अंगणवाडी सेविका 0, आरोग्य सेविका 0, महसूल विभाग 1, ग्रामपंचायत कर्मचारी 0, महानगरपालिका कर्मचारी 0, नगरपालिका कर्मचारी 0.
राहुरी - एकूण बी. एल.ओ. 307 पैकी शिक्षक 284, अंगणवाडी सेविका 5, आरोग्य सेविका 2, महसूल विभाग 1, ग्रामपंचायत कर्मचारी 15, महानगरपालिका कर्मचारी 0, नगरपालिका कर्मचारी 0 . पारनेर - एकूण बी. एल.ओ. 365 पैकी शिक्षक 349, अंगणवाडी सेविका 5, आरोग्य सेविका 3, महसूल विभाग 0, ग्रामपंचायत कर्मचारी 8, महानगरपालिका कर्मचारी 0, नगरपालिका कर्मचारी 0. अहमदनगर शहर - एकूण बी. एल.ओ.289 पैकी शिक्षक 134, अंगणवाडी सेविका10, आरोग्य सेविका 2, महसूल विभाग 0, ग्रामपंचायत कर्मचारी 0, महानगरपालिका कर्मचारी 143, नगरपालिका कर्मचारी 0 .
श्रीगोंदा - एकूण बी. एल.ओ. 344 पैकी शिक्षक 290, अंगणवाडी सेविका 5, आरोग्य सेविका 5, महसूल विभाग 3, ग्रामपंचायत कर्मचारी 32, महानगरपालिका कर्मचारी 0, नगरपालिका कर्मचारी 9. कर्जत-जामखेड - एकूण बी. एल.ओ. 353 पैकी शिक्षक 334, अंगणवाडी सेविका 0, आरोग्य सेविका 4, महसूल विभाग 2, ग्रामपंचायत कर्मचारी 13, महानगरपालिका कर्मचारी 0, नगरपालिका कर्मचारी 0.
बी.एल.ओ. म्हणून शिक्षकांच्या नेमणूकीसंदर्भातील ही आकडेवारी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दूरगामी परिणाम करणारी असून प्राथमिक शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर दिलेल्या बी.एल.ओ. नेमणूका जिल्हा परिषद शाळेत शिकणार्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतील मोठा अडसर ठरत आहेत. त्यामुळे बी.एल.ओ. सारख्या अशैक्षणिक कामातून प्रशासनाने शिक्षकांची तात्काळ मुक्तता करावी व शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकू द्यावे. अशी मागणी आता पालक व शिक्षकांमधून जोर धरू लागली आहे.
शिक्षकांना बी.एल.ओ.सारखी अनेक अशैक्षणिक कामे लावून जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांपासून दूर ठेवले जात आहे त्याचा परिणाम गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असून अशा अशैक्षणिक कामासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघामार्फत सातत्याने पाठपुरावा सुरु असून लवकरच शिक्षकांची या कामातून सुटका होईल. - बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते, अहमदनगर.
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या 4 ऑक्टोबर 2022 च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी यांनी अद्याप केलेली नाही. जिल्ह्यांमध्ये त्यांनी कमीत कमी शिक्षकांना इङज च्या नियुक्त्या न देता त्या सुमारे 87 टक्के इतक्या जास्तीत जास्त नियुक्त्या केलेल्या आहेत. लवकरच जिल्हाधिकारी अहमदनगर यांना भेटून मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही होणेबाबत विनंती केली जाणार आहे. - राजेंद्र निमसे, राज्य संघटक, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ.
बी.एल.ओ. अन काम करून करून मेलो अशी सर्व बी.एल.ओ. शिक्षक बंधुभगिनींची अवस्था आहे. सदरचे काम करतांना विद्यार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते. सदर कामातून शिक्षकांना वगळले पाहिजे. - अनिल शिंदे, सरचिटणीस, राहुरी तालुका प्राथमिक शिक्षक संघ व बी.एल.ओ. राहुरी
Comments