एसटी बस पुन्हा आगारात दाखल । अनेक बस रिकाम्याच आल्या
शेवगाव । वीरभूमी - 26-Oct, 2023, 09:50 AM
विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी येथे येत आहेत. या कार्यक्रमासाठी लोकांना जाण्यासाठी प्रत्येक गावातून एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून गावागावात राजकीय पुढार्यांना बंदी करण्यात आली आहे. शिर्डी येथील सभेसाठी लोकांना घेवून जाण्यासाठी शेवगाव तालुक्यातील मंगरुळ येथे गेलेल्या एसटी बसच्या अज्ञातांनी काचा फोडल्याची घटना आज सकाळी घडली. यामुळे ही बस चालकाने पुन्हा शेवगाव आगारात आणली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांचे उद्घाटने व भुमिपुजनासाठी आज गुरुवारी शिर्डी येथे येत आहेत. तसेच शिर्डी येथे भव्य शेतकरी मेळावा व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. यामुळे या कार्यक्रमाला गर्दी करण्यासाठी प्रत्येक गावातून एसटी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्यातच सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून गावागावांत राजकीय पुढार्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. शिर्डी येथील कार्यक्रमांसाठी लोकांना घेवून जाण्यासाठी एसटी बस आज सकाळी शेवगाव आगारातून मंगरुळ येथे पोहोचली. एसटी बस (क्र. एमएच. 14, बीटी 2158) गावामध्ये येताच अज्ञाताने दगडफेक करत बसची मागील काच फोडली.
या घटनेनंतर चालक पी. जे. फुंदे यांनी बस पुन्हा शेवगाव आगारात आणली. आगारात बसचा पंचनामा करण्यात आला असून याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र शिर्डी येथे कार्यक्रमासाठी जाणार्या अनेक बस मोकळ्याच परतत असल्याचे चित्र आहे.
Comments