काकडे शैक्षणिक समुहातील सर्व आस्थापना, शाळा, कॉलेजला एक दिवसाची सुट्टी
शेवगाव । वीरभूमी- 30-Oct, 2023, 04:36 PM
राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मोठा संघर्ष उभा केला आहे. गेल्या काही दशकापासून सर्वच क्षेत्रात आरक्षणा अभावी मराठा समाज पाठीमागे पडत आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उभा केलेला संघर्ष योग्य आहे.
त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील सर्व आस्थापना, सर्व शाळा, कॉलेजेस हे बंद राहणार असल्याची माहिती आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष अॅड.विद्याधर ऊर्फ शिवाजीराव काकडे यांनी दिली आहे.
अॅड. काकडे म्हणाले की, सर्वसामान्य, गोरगरिबांचे, वंचितांच्या पाठीमागे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह सातत्याने काही पिढ्यापासून उभा आहे.
आज महाराष्ट्रामध्ये गरजवंत मराठ्यांना शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसापासून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले आहेत.
आज सामान्यांचा वापर राजकारणी फक्त राजकारणासाठीच करत आलेले आहेत. मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची झालेली आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षण घेण्यास मराठा समाजाला अत्यंत अवघड होत चाललेले आहे. अशा परिस्थितीमध्ये श्री.मनोज जरांगे यांनी जो विषय मांडलेला आहे तो रास्त व न्यायाचा आहे. मराठा समाजासाठी केलेली त्यांची मागणी योग्य आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयाबाबत तातडीने निर्णय घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, असेही अॅड. शिवाजीराव काकडे म्हणाले.
Comments