शेवगाव । वीरभूमी - 04-Nov, 2023, 02:40 PM
डोंबार्याच्या खेळादरम्यान वाजविण्यात येणारे प्रभु श्रीरामचंद्राचे गाणे बंद करण्यासाठी डोंबार्याच्या मुलाच्या गळ्याला सुरा, तलवारीचा धाक दाखवून गाणे बंद करण्यास भाग पाडले. तसेच याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तीघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शेवगाव तालुक्यातील जुने दहिफळ येथे शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात समीर फिरोज शेख, अफरोज पापाभाई शेख, आरीफ दस्तगीर पठाण व भोर्या फिरोज पठाण (सर्व रा. जुने दहिफळ, ता. शेवगाव) यांच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद गोकुळ हरिश्चंद्र व्यवहारे (रा. जुने दहिफळ, ता. शेवगाव) यांनी दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, जुने दहिफळ (ता. शेवगाव) ग्रामपंचायतीसमोर दि. 2 नोव्हेंबर पासून डोंबार्याचा खेळ सुरु आहे. डोंबारी अधून मधून देशभक्ती, धार्मीक गाणे वाजवून लोकांना आपला खेळ दखवत असतो.
दरम्यान नेहमीप्रमाणे शुक्रवार दि. 3 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास डोंबार्याचा खेळ सुरु असतांना त्याने प्रभु श्रीरामचंद्राचे गाणे वाजवून खेळ करत असतांना तेथे समीर फिरोज शेख, अफरोज पापाभाई शेख, आरीफ दस्तगीर पठाण व भोर्या फिरोज पठाण (सर्व रा. जुने दहिफळ, ता. शेवगाव) हे आले. या चौघांनी डोंबार्याचा मोठ्या मुलाच्या गळ्याला सुरा व तलवार लावून गाणे बंद कर नाहीतर येथेच भोकसून टाकतो, अशी दमबाजी करत गाणे बंद करण्यास भाग पाडले.
त्याचवेळी तेथे उपस्थित असलेले फिर्यादी यांच्यासह गावातील भगवान साहेबराव भोसले व रविंद्र भगवान व्यवहारे यांनी कार्यक्रम का बंद पाडतो? असे विचारले असता या तिघांनाही तलवार, सुरा दाखवत तुम्हालाही भोकसून टाकील, असा दम देत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकाराने गावामध्ये दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला आहे.
याबाबत आज शनिवारी फिर्यादी यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात येवून सविस्तर फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन वरील चौघांवर गावातील शांतता भंग करणे, जाणीवपूर्वक कोणाचातरी अपमान होईल असे कृत्य केल्याप्रकरणी कलम 504, 505 (2), 506, 4, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान शुक्रवारी रात्री जुने दहिफळ येथील काहीजण शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. मात्र तेथील एका अधिकार्याने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर तेथे शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्यांनी येवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र त्यांनाही या अधिकार्याने जुमानले नाही.
अखेर आज शनिवारी सकाळी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्यांनी पोलिस निरीक्षकांची भेट घेत घटनेचे गांभिर्य लक्षात आणुन दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
Comments