वडुले येथील दिपक गुगळेवर कोतवालीत गुन्हा दाखल
नगर । वीरभूमी - 05-Nov, 2023, 02:34 PM
सामाजिक संस्थेतून बोलत आहे, आम्हाला गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करायच्या आहेत. 30 मशीन पाठवा अशी फोन वर ऑर्डर दिल्यानंतर माल पोहोच करायला गेलेल्या वाहनातून त्यातील 20 शिलाई मशीन पैसे न देता दुसर्या वाहनात भरून पळवून नेत व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका अनोळखी व्यक्तीवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमित दिपक बठेजा (वय 33, रा. बीएसएनएल ऑफीस समोर, गुलमोहर रोड) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बठेजा यांचे प्रोफेसर चौक समर्थ शाळेच्या शेजारी शितल ट्रेडींग कंपनी नावाने शिलाई मशीन विक्रीचा व्यवसाय आहे. तर त्यांची बहिण शितल नरेश ठाकुर हिचे कोतवाली पोलीस स्टेशन समोर शितल एन्टरप्रायझेस नावाने शिलाई मशीन विक्रीचे दुकान आहे. ते दोघेही एकमेकांच्या शिलाई मशीन विक्री करण्यास मदत करत असतात.
दि.10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास बठेजा हे बहिण शितल ठाकुर हिच्या दुकानात बसलेले असतांना त्यांना मो. 8411849553 या फोनवरुन फोन आला व म्हणाला की, मी दिपक गणेश गुगळे बोलतोय, आम्हांला संस्थेतर्फे महिलांना शिलाई मशीनची वाटप करायची आहे. मला 30 मशीन सेट पाहिजे असे म्हटल्याने बठेजा यांनी त्यांना कोतवाली पोलिस ठाण्यासमोरील दुकानात बोलावून घेतले.
तेथे त्या व्यक्तीने येवून सांगितले की, तुम्ही 30 शिलाई मशीन द्या, त्यातील 15 मशीन पांढरीच्या पुलावर ठेवायच्या व 15 मशीन घोडेगांव, मार्केट यार्ड येथील गाळा 2 मध्ये ठेवायच्या आहेत. तसेच सर्व मशीनचे पैसे हे घोडेगांव येथे देतो असे त्याने सांगितले. त्यानंतर बठेजा यांनी एक अॅपे रिक्षा भाड्याने करुन त्यात भारत कंपनीच्या 30 शिलाई मशीन सेट भरुन दिला. अॅपे रिक्षावाला हा पांढरी पुल येथे गेल्यानंतर दिपक गणेश गुगळे याने अॅपे रिक्षामधील 30 पैकी 20 भारत कंपनीच्या शिलाई मशीन सेट दुसर्या गाडीमध्ये टाकुन अॅपे रिक्षाचालक याला काही एक न सांगता तेथुन निघुन गेला.
त्यानंतर रिक्षाचालक याने त्याचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचेशी संपर्क झाला नाही. ही बाब त्याने बठेजा यांना सांगितली. बठेजा यांनीही त्याला संपर्क केला मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपली फसवणुक झाली असून आपल्या 94 हजार रुपये किमतीच्या 20 शिलाई मशीन आरोपी दिपक गणेश गुगळे (रा. वडुले खुर्द, ता. शेवगांव) याने चोरून नेल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मात्र त्याच दिवशी त्यांचा मावसभाऊ मयत झाल्याने त्यांना लगेच फिर्याद देता आली नाही. सर्व धार्मिक विधी उरकल्यावर बठेजा यांनी शनिवारी (दि.4) पहाटे कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Comments