स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा । पहिली उचल 3100 रुपये देण्याची मागणी
शेवगाव । वीरभूमी - 07-Nov, 2023, 02:50 PM
मागील गळीत हंगामात साखर कारखानदारांना साखरेसह इतर उपपदार्थापासून प्रति टन 5400 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. यावर्षीही साखरेला चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला प्रति टन पहिली उचल 3100 रुपये मिळावी. व मागील हंगामातील साखरेतील व उपपदार्थांमधील वाढलेल्या दराचा फरक म्हणून 300 रुपये दिवाळीच्या सणासाठी शेतकर्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावेत, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकर्यांनी गेल्या दोन महिन्यापासून कारखानदार व प्रशासनास वारंवार पाठपुरावा करत आहे.
परंतु साखर कारखानदार यांनी मौन बाळगणे पसंत केल्यामुळे शेतकर्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालेला आहे. त्याच्यातच भर म्हणून चालू गाळपासाठी जाणार्या उसाचा भाव जाहीर न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्यांमध्ये असंतोष आहे. या चालू हंगामातील उसाची पहिली उचल 3100 रुपये 10 नोव्हेंबरच्या हात जाहीर न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी बुधवार दि.15 नोव्हेंबरपासून ऊसतोड व वाहतूक बंद करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पत्राद्वारे सर्व कारखानदार व प्रशासनाला कळविले आहे.
मागील सलग दोन वर्षांपासून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यामुळे कारखानदारांना मोठा लाभ झालेला आहे. त्यातच साखर, मळी, इथेनॉल, मॉलिसिस व वीज यांचे दर वाढलेले आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात कारखानदारांना लाभ झालेला आहे. पण शेतकर्यांना या लाभापासून वंचित ठेवले आहे. या सर्व गोष्टीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांनी हा निर्णय घेतला आहे.
तसेच आपल्या हक्काचे दाम मिळवण्यासाठी सर्व शेतकर्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे व आपली ऊस तोडणी बंद ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी शेवगावचे तहसीलदार श्री. सांगडे यांना स्वाभिमानीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, मच्छिंद्र आर्ले, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, तालुका अध्यक्ष अशोक भोसले, तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, शहराध्यक्ष अमोल देवढे, युवक अध्यक्ष हरिभाऊ कबाडी, दादासाहेब पाचरणे, विकास साबळे, नानासाहेब कातकडे, नारायण पायघन, अंबादास भागवत यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
pLbotkDgmlwRUrG