संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचातींवर आ. थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व
सरकार विरोधात जनतेत तीव्र नाराजी ः आ. बाळासाहेब थोरात
संगमनेर । वीरभूमी - 07-Nov, 2023, 04:01 PM
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतवर आ थोरात यांचे वर्चस्व असून निवडणूक झालेल्या ग्रामपंचायत वर आ. थोरात गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. या सर्व विजयी उमेदवारांचा आमदार थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून केंद्र व राज्यातील सरकार विरोधात जनतेमध्ये तीव्र नाराजी असून आगामी काळात काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार केंद्रात व राज्यात सत्तेवर येईल असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे ग्रामपंचायत निवडणुकींमधील विजयी उमेदवारांचा सत्कार आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अॅड. माधवराव कानवडे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, संतोष हासे, बादशहा वाळुंज, विजय हिंगे, संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
ढोलेवाडी व बोरबन या ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून ढोलेवाडीच्या सरपंच पदी सौ शालिनीताई बाळासाहेब ढोले, तर बोरवन च्या सरपंच पदी सौ अरुणा बाळासाहेब गाडेकर यांची निवड झाली आहे. गुंजाळवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी अमोल उर्फ नरेंद्र संभाजी गुंजाळ यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली असून 17 पैकी 17 जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे .तर आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये आमदार थोरात गटाने दहा जागांवर बाजी मारत विखे गटाचे पानिपत केले आहे. सरपंचपदी आ. थोरात गटाचे पाणी वाटपासाठी असलेले ग्रामपंचायत कर्मचारी उर्फ पाणीवाले बाबा नामदेव किसन शिंदे हे विजयी झाले आहेत.
पिंपळगाव कोझिरा ग्रामपंचायत मध्ये सर्व नऊ सदस्य काँग्रेस पक्षाचे विजयी झाले असून सरपंचपदी सौ. सोनाली संदीप करपे या विजयी झाल्या आहेत. तर घारगाव व अश्वि खुर्द ग्रामपंचायत मध्येही काँग्रेस पक्षाचे सदस्य विजयी झाले आहेत.
यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात कायम सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण केले जात आहे. सर्व ग्रामपंचायतमध्ये झालेला विजय हा कार्यकर्त्यांच्या एकीचा व विकास कामांचा आहे. या निवडणुकीत बाह्यशक्तींनी मोठ्या दबावाचा व इतर गोष्टींचा खूप वापर केला. मात्र जनतेने त्यांना थारा दिला नाही. संगमनेर तालुक्यातील जनतेला त्यांची दहशत मान्य नाही.
आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत मध्येही कार्यकर्त्यांनी जिकरीने लढा दिला. तेथे मोठ्या दबाव तंत्राचा वापर झाला. खूप ताकद लावली गेली. मात्र जनतेने दडपशाही झुगारली. राहाता तालुक्यामध्ये ही काँग्रेस पक्षाच्या विचाराला मोठे यश मिळाले आहे. यापुढेही सर्वांनी गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी एकत्र राहावे असे सांगताना राज्यातील व केंद्रातील सरकारवर जनतेची पूर्ण नाराजी आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी, अस्थिरता, अंमली पदार्थांची तस्करी, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारचे शेतकरी व सर्वसामान्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जनतेमध्ये मोठा रोष असून राज्यात सर्वत्र काँग्रेसची हवा आहे.
आगामी काळात काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी नामदार बाळासाहेब थोरात जिंदाबाद, या घोषणांसह गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजीने यशोधन परिसर दुमदुमून गेला.
ये बंधारे जोरात, लई बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात या गाण्यावर तरुणाईने एकच ठेका धरला. तर गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी करत यशोधन कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून दिला.
Comments