अकोले । वीरभूमी - 09-Nov, 2023, 01:05 PM
अकोले तालुक्यातील निळवंडे धरणावरील पिंपरकणे सेतू पुलाचे खरे श्रेय हे माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना असून त्याचे श्रेय कोणी एकट्या दुकट्यानी घेऊ नये, असा आरोप काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी केला आहे.
माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात हे क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी देवगाव येथे आले होते. त्यानंतर आदिवासी कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर पिंपरकणे पुलाची पाहणी करण्यासाठी आ. थोरात यांनी भेट दिली. निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन फुले आणि श्रीफळ वाढवून केले.
यावेळी श्री. पांडे बोलत होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले, उत्कर्षाताई रुपवते, अमित भांगरे, प्रदेश सरचिटणीस सतीश भांगरे, तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, संतोष मुर्तडक, विक्रम नवले, मंदाबाई नवले, रामदास धुमाळ आदिसह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मीनानाथ पांडे पुढे म्हणाले की, निळवंडे धरण हार्दिक बहुउद्देशीय प्रकल्प असून या अंतर्गत अनेक पूल, रस्ते, वीज निर्मिती प्रकल्प, म्हाळादेवीचा जलसेतू, कालवे, असे विविध कामांना मंजुरी दिलेली आहे.
निळवंडे धरणात पाणी साठल्यानंतर राजूर व परिसरातील 22 गावांचा संपर्क तुटणार होता. त्यावेळी सत्तेत असलेले आघाडी सरकार मधील मंत्री मधुकरराव पिचड व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 2007-08 या वर्षी या आशिया खंडातील सर्वात मोठया पिंपरकणे पुलाला मंजुरी दिली. त्यानंतर भाजप सेना युतीच्या सरकारने या पुलाचे काम मुद्दामहुन रखडवलेले होते.
त्यानंतर पुन्हा आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या पुलाच्या कामाला निधी देऊन काम सुरु केले. त्यामुळे याचे खरे श्रेय माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना आहे. मात्र कोणीतरी एकटा दुकटा याचे श्रेय घेत आहे. त्यांनी ते घेऊ नये असा घणाघाती आरोप केला. तसेच मध्यंतरी पोलीस बंदोबस्तात ज्यांचे या निळवंडे धरणासाठी कोणतेही योगदान नाही अशांनी निळवंडे धरणाचे लोकार्पण केले. त्यावेळी ज्यांचे खरे योगदान आहे त्यांना त्यावेळी बोलावले नाही.
आजही पिंपरकणे पुलाचे ही कोणी एकजण उद्घाटन करतो. त्यांनीही एकट्यानेच उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, अशी टीका केली. यामध्ये खरे योगदान माजी मंत्री मधुकरराव पिचड व बाळासाहेब थोरात यांचे आहे असे श्रेय घेणार्यांना स्पष्ट सुनावले. निळवंडे धरण पूर्ण झाले, त्यासाठी आधी पुनर्वसन मग धरण हे धोरण घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय देता आला.
या धरणावर पिंपरकणे पुलही पूर्ण झाला याचा आनंद आहे. आघाडी सरकारच्या काळात या पुलाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर युती सरकारने निधी दिला नाही. पुन्हा आघाडी सरकार आल्यावर निळवंडेच्या रखडलेल्या विविध प्रकल्पाना निधी दिला. त्यामुळे अनेक प्रकल्प उभे राहिले, येथे पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे.
पर्यटक याचा व येथील निसर्गरम्य परिसराचा आनंद घेतील, ज्यांच्या जमिनी या निळवंडे धरणासाठी जमिनी गेल्या. त्यांच्यासाठी काहीतरी करावे लागणार आहे, असे मत व्यक्त केले.
Comments