पाथर्डी । वीरभूमी - 18-Nov, 2023, 11:03 PM
पाथर्डी व शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, तसेच मुळा व जायकवाडी धरणाचे पाणी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 262 गावांतील शेतीसाठी पाईपलाईनद्वारे मिळावे व इतर बारा मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव बसस्थानक चौकात सुमारे पाऊण तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांच्यासह भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, आम आदमी पार्टीचे सुभाष केकाण, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद सानप, तिनखडीचे सरपंच बाळू खेळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवा पवार, भिलवडेचे सरपंच सुरेश बडे, भारत बडे, सुभाष गायकवाड, सोमनाथ बडे, फैयाज पठाण, भागवत बुधवंत, अक्षय साळवे, गोरक्ष पालवे, अंबादास कारखेले आदींसह तालुक्यातील शेतकरी या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी तुळशीराम सानप म्हणाले की, पाथर्डी तालुक्यात पिण्यासाठी पाणी, जनावरांच्या चार्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र शासनाने पाथर्डी तालुका दुष्काळी तालुका घोषित न करता तालुक्यातील काही मंडलाचा समावेश दुष्काळजन्य संभाव्य यादीत समावेश केला आहे. मात्र पूर्ण तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असून शासनाने त्वरीत निर्णय घेऊन दुष्काळ जाहीर करावा.
तसेच मुळा व जायकवाडीचे पाणी सतत दुष्काळी असलेल्या शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील 262 गावांना पाईपलाईन द्वारे शेतीसाठी मिळावे. यासाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यांनीही त्या निवेदनाची दखल घेत जिल्हा नियोजन च्या बैठकीत हा मुद्दा मांडला. त्यानुसार पालकमंत्री यांनीही शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याचे सांगितले.
भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे वर्षानुवर्ष जिरायती तालुका म्हणून पाथर्डी, शेवगाव तालुके परिचित आहेत. यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यात तीव्र दुष्काळ दुष्काळी परिस्थिती असूनही दुष्काळी यादीत समावेश होत नाही. याला कुठेतरी लोकप्रतिनिधी जबाबदार असून त्यामुळे तुळशीराम सानप सारख्या शेतकर्याला रस्त्यावर उतरावे लागले.
मी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलो आहे. याच विषयावर उद्या दिनांक 22 पासुन पाथर्डी शहरातील नाईक चौकात आमरण उपोषण सुरू करणार आहे. शासनाने त्वरित निर्णय घेऊन पाथर्डी, शेवगाव तालुके दुष्काळी तालुके म्हणुन जाहीर करावेत.
या वेळी मंडळाधिकारी प्रमोद कटारनवरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
Comments