जिल्ह्यातील 107 गावांत अवकाळीचा कहर
9 हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान । 10 जनावरे मृत्यूमुखी, 25 घरांची पडझड
अहमदनगर । वीरभूमी - 28-Nov, 2023, 10:50 AM
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 107 गावांतील तब्बल 8 हजार 571 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले असून 10 जनावरे मृत्युमुखी पडले असून 25 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतीपिकांचे नुकसान झालेल्यामध्ये कापूस, कांदा, मका, भात यासह पेरु, डाळिंब, द्राक्षे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान पारनेर व अकोले तालुक्यात झाले आहे.
या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. सलग चाथ्या वर्षी नोव्हेंबर महिण्यात अवकाळीने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
नगर जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी नोव्हेंबर महिण्यात अवकाळीने मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यात शनिवार व रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 107 गावांत नुकसान झाले असून 8 हजार 571 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात 15 हजार 307 शेतकरी बाधित झाले तर 10.90 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या सर्व प्राथमिक नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने आयुक्त कार्यालयाला पाठवला आहे. रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने पारनेर, संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव या तालुक्याला चांगलेच झोडपले. यात डाळिंब, कांदा, भात, मका, भाजीपाला, टोमॅटो पिकांचे नुकसान झाले.
वादळी वार्यासह झालेल्या गारांच्या पावसाने पशुधनाचीही हानी झाली. या अवकाळीत 10 जनावरांचा मृत्यू झाला आहे. श्रीरामपूरमधील खंडाळ्यात 1 बैलाचा मृत्यू झाला आहे. झाड विजेच्या तारांवर कोसळले व या तारा बैलाच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. राहुरीत दोन मेंंढ्या, तीन कोकरू तर संगमनेरमध्ये चार मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. या वादळी वार्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात 25 घरांची पडझड झाली आहे. त्यात अकोले 1, पारनेर 4, राहुरी 7, संगमनेर 10 तर श्रीरामपूर 2 घरांचा समावेश आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. जिल्ह्यात 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या तालुक्यामध्ये पारनेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. पारनेर तालुक्यातील 24 गावांमधील 7 हजार 459 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून सुमारे 12 हजार 100 शेतकर्यांना त्याचा फटका बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने कांदा, केळी, मका, पेरू, डाळिंब, पपई, सिताफळ, टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले आहे.
या खालोखाल अकोले तालुक्यात 60 गावांमध्ये अवकाळीने होत्याचे नव्हते केले आहे. येथे 927 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे, कापूस, भात, कांदा या पिकांचे नुकसान झाले असून 2 हजार 910 शेतकरी बाधित आहेत.
संगमनेर तालुक्यात 13 गावांमधील 133 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 215 शेतकरी तर राहाता तालुक्यातील 4 गावांमधील 52 हेक्टर क्षेत्रातील कापूस, मका, केळी या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा फटका 82 शेतकर्यांना बसला आहे. कोपरगाव तालुक्यातील 6 गावांमधील 10.90 हेक्टर क्षेत्रातील 12 शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र हे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा अहवाल आयुक्त कार्यालयाला पाठविलेला आहे.
9 मंडळांत अतिवृष्टी : पारनेर तालुक्यातील निघोज 82 मिमी, भातकुडगाव (ता. शेवगाव) 69 मिमी, नेवाशातील सलाबतपूर 69 मिमी, कुकाणा 69 मिमी, देवळाली 110, आश्वी 72 मिमी, तळेगाव 70 मिमी, पोहेगाव 66, श्रीरामपूर 65, वडाळा 78, सोनगाव 70, अकोले 92, संगमनेर तालुक्यातील सिबलापूर या 9 मंडळांत अतिवृष्टी झाली. याशिवाय पळशी 60, समनापूर 50, पिंपरणे 61, सात्रळ 61, ताहाराबाद 53, टाकळीमियाँ 57 आदी ठिकाणीही अवकाळी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात 59 महसूल मंडळात 20 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
तातडीने अवकाळी नुकसानीचे पंचनामे करा; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला आदेश : दोन दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिक, फळबागा आणि दगावलेल्या जनावारांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. तसेच ग्रामीण भागातील काही नागरिकांच्या घरांचे किंवा जनावरांच्या गोठ्याचे नूकसान झाल्यास तातडीच्या उपाययोजना व मदत करण्याबाबत प्रशासनास सांगितले आहे. या नैसर्गिक संकटात राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
तसेच गारपीटीने झालेल्या नूकसानीची माहीती मंत्री विखे पाटील यांनी प्रशासनाकडून जाणून घेतली. नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने एकत्रितपणे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणखीनही काही दिवस पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकर्यांनी काळजी घेण्याचे आवाहन मंत्री विखे यांनी केले. नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी अधिकर्यांसमवेत पाहाणी दौरा करणार असून सद्य परिस्थितीत स्थानिक अधिकार्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना केल्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आहेत.
gPLMjaZfczTxWR