पाथर्डी आगार व्हेंटिलेटरवर, सुधारणा करा अन्यथा आंदोलन
प्रवाशांसह विविध संघटनांकडून आंदोलनाचा इशारा । सराफ सुवर्णकार संघटनेचेही निवेदन
पाथर्डी । वीरभूमी- 04-Dec, 2023, 02:16 PM
कालबाह्य झालेल्या गाड्या, दुरुस्तीसाठी सुट्या भागांची कमतरता, स्थानिक यंत्रणांची अकार्यक्षमता, यामुळे पाथर्डी आगार अक्षरशः व्हेंटिलेटर वर गेले असून मराठवाड्यासह बाहेरील आगारांच्या गाड्यांनी स्थानिक आगाराचे कंबरडे आणखी मोडले आहे. स्थानिक आगाराच्या गाड्या कुठेही बंद पडत असल्याने तालुक्यातील प्रवासी अन्य आगाराच्या गाड्यांना प्रवासासाठी प्राधान्य देतात.
कोरोना कालावधीनंतर आगाराची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. अधिकारी, कर्मचारी, कामगार एवढेच काय तर प्रवासी सुद्धा आगाराच्या नावाने अहोरात्र खडे फोडतात. बहुसंख्य कर्मचारी स्थानिक असूनही गाड्या उशिरा सुटतात. देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने गाड्यांची वेळ पाळली जात नाही असे चालक वाहकांचे म्हणणे आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा कोठेही कधीही बंद पडतील याचा भरवसा नसल्याने बीड, माजलगाव, गेवराई, आष्टी, पाटोदा, कल्याण या आगारांच्या गाड्यांना स्थानिक प्रवासी प्राधान्य देतात. बाहेरील आगाराच्या गाड्यांना प्रतिसाद चांगला मिळत असल्याने दिवसागणित नवनवीन गाड्यांची भर पडत असताना स्थानिक गाड्या मात्र रस्त्यात कोठेही बंद पडतात.
खाजगी गाड्या असत्या तर प्रादेशिक परिवहन विभागाने या गाड्या केव्हा जप्त केल्या असत्या. एसटीवर मात्र परिवहन विभाग काही कारवाई करत नाही. गाडी पळते म्हणून चालवायची असा सल्ला अधिकार्याकडून कर्मचार्यांना दिला जातो. अधिकारी परगावावरून ये जा करीत असल्याने आगाराचा कारभार पूर्णपणे कोलमडला आहे. वरिष्ठ अधिकार्यांची पाथर्डी आगाराकडे बघण्याची नकारात्मकता बदलत नसल्याने कसल्याही प्रकारचे सहकार्य विभागीय पातळीवर होत नाही. जिल्ह्यातील प्रमुख आगारांना मागणीप्रमाणे गाड्यांचे वाटप होते,
येथील आगाराला मात्र दिलेल्या गाड्या सुद्धा पुन्हा घेऊन गेल्याने पाथर्डी आगार बंदच करून गेवराई अथवा बीड आगाराला चालविण्यास दिल्यास प्रवाशांची सोय तरी होणार आहे. गाड्यांची अवस्था अत्यंत नाजूक बनल्याने चालक वाहक सुद्धा अक्षरशः देवाचे नाव घेऊन गाडीत बसतात. सकाळी पाच वाजल्यापासून लांब पल्ल्याच्या गाड्यांना गर्दी असते. पाथर्डी आगाराने मागणी असलेली पंढरपूर गाडी बंद केली. कोल्हापूर गाडी वेळेवर जात नाही. तुळजापूर गाडी बंद केली. आणि असे करण्याला समर्थन काही नाही. संभाजीनगरला दुपारी बाराच्या दरम्यान गाडी जात होती ती सुद्धा बंद केली.
मिरी मार्गे नाशिक गाडी वीस वर्षांपासून बंद आहे. गाड्या नाहीत एवढेच कारण सांगितले जाते. विभाग नियंत्रकांनी अनुभवी, अभ्यासू व उत्पन्नाची तळमळ असलेला अधिकारी पाथर्डीला दिल्यास कारभारात सुसूत्रता वाढणार आहे. पाथर्डी आगाराला नव्याने मिळणार्या गाड्या साठी किमान 30 नवीन गाड्या मिळाव्यात. आगाराकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने मन मानेल त्या पद्धतीने आगाराचा कारभार चालतो. जुन्या बस स्थानकात अतिक्रमणामुळे चालक वाहकांना गाडी सुद्धा बाहेर काढता येत नाही.
जुन्या बसस्थानकामध्ये गाड्या घुसून अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवाशांची वाहतूक करतात. जुने बस स्टॅन्ड म्हणजे अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांचे तळ बनले आहे. अधिकारी निमुटपणे डोळे झाक करून शांत बसतात. वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण देत नव्याने पाडलेले दार जुन्या बसस्थानकावरून वापरत नसल्याने तेथे पुन्हा अतिक्रमणे होऊ लागले आहेत.
आगाराचा कारभार न सुधारल्यास प्रवाशांचं विविध संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने सुद्धा देण्यात आला आहे. यापूर्वी प्रवासी संघटनेने आंदोलन केले होते त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची अजून पूर्तता नाही. नगरहून सायंकाळी येण्यासाठी गाड्या नसतात. डबल पैसे मोजून गरजू प्रवाशांना अवैध प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
सराफ सुवर्णकार संघटना तर्फे अध्यक्ष बाळासाहेब जिरेसाळ, पांडुरंग शिळवणे, सुनील शहाणे, मोदक शहाणे, बाळासाहेब जोजारे, वैभव चिंतामणी, अशोक नांदेवलीकर, राजेंद्र चिंतामणी, रमण भंडारी आदींनी निवेदन देत कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
Comments