पाथर्डी । वीरभूमी - 08-Dec, 2023, 01:29 PM
मागील काही दिवसापासून पाथर्डी तालुक्यातील शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक या पदांचा कारभार प्रभारी होता. मात्र नुकत्याच आठ प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणुन पदोन्नती मिळाल्याने काही अंशी प्रभारी कारभार संपुष्ठात आला आहे. मात्र गटशिक्षणाधिकारी पदावरही कायम व्यक्तीची नेमणुक करुन रिक्त असलेल्या इतर जागा तातडीने भरण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील 18 केंद्रप्रमुखांच्या जागा रिक्त होत्या. रिक्त असलेल्या केंद्रप्रमुखांच्या आठ जागांवर शिक्षकांना पदोन्नती देवून आणखी एका केंद्राचा अतिरीक्त पदभार देण्यात आला आहे. यामुळे शिक्षण विभागातील कामकाजात सुसुत्रता येण्यास मदत होणार आहे.
पाथर्डी तालुक्यात 18 केंद्र असून मागील काही महिण्यापासून एक केंद्र वगळता 17 केंद्रप्रमुखांच्या जागा रिक्त होत्या. यामुळे उर्वरीत ठिकाणी केंद्रप्रमुखांचा पदभार हा अतिरीक्त व प्रभारी होता. यामुळे प्रभारी केंद्रप्रमुख म्हणुन काम पहाणार्या मुख्याध्यापकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता.
या शिक्षकांना विद्यादानासोबतच नेमणुक असलेल्या शाळेचा पदभार सांभाळून वरीष्ठांना विविध माहित्या पुरविणे, केंद्रातील शाळांना भेटी देणे, तपासणी करणे अशी विविध कामे करावी लागत होती. याचा परिणाम नेमणुक असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिकवणीवर जाणवत होता.
पाथर्डी तालुक्यातील रिक्त असलेल्या जागेवर आठ शिक्षकांना पदोन्नतीने केंद्रप्रमुखांचा पदभार सोपविण्यात आला. यामध्ये बाबा गोसावी (टाकळी मानुर), रामदास लांघी ( माणिक दौंडी), एम. ई. गोरे (चिचोंडी), दगडू महाडुंळे (मिरी), बाळासाहेब पोळ (खरवंडी कासार), बाळासाहेब जाधव (तिसगाव), उद्धव बडे (पिंपळगाव टप्पा), श्रीमती पुष्पा ठुबे (पाथर्डी) यांच्या पदोन्नतीने नेमणुका करण्यात येवून आणखी एका केंद्राचा अतिरीक्त पदभार देण्यात आला. या पदोन्नतीअगोदर राजेंद्र बागडे (साकेगाव) हे एकमेव केंद्रप्रमुख होते. त्यांच्याकडेही आणखी एका केंद्राचा अतिरीक्त पदभार आहे.
तालुक्यातील 18 पैकी 9 केंद्रप्रमुखांच्या निमणुका झाल्या असून लवकरच जाहीर झालेल्या परिक्षेमधून आणखी 9 केंद्रप्रमुखांच्या जागा भरल्या जाणार आहेत. मात्र तो पर्यंत नेमणुक असलेल्या 9 केंद्रप्रमुखांनाच इतर 9 केंद्राचा अतिरीक्त कारभार पहावा लागणार आहे.
गटशिक्षणाधिकार्यांची नेमणुकही कायम करावी : पाथर्डी तालुक्यातील शिक्षण विभागात मागील अनेक दिवसापासून प्रभारी कारभार सुरु आहे. आता केंद्रप्रमुखांच्या नेमणुका झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र गटशिक्षणाधिकार्यांचा पदभार हा शिक्षण विस्ताराधिकारी यांचेकडे प्रभारी म्हणुन आहे. केंद्रप्रमुखांप्रमाणेच गटशिक्षणाधिकारी पदावरही कायमस्वरुपी नेमणुक करावी, अशी मागणी होत आहे.
iCpXGyucA