शेवगाव पोलिसांची कारवाई । गावठी कट्टा, 3 जीवंत काडतुस व दोन मोबाईल जप्त
शेवगाव । वीरभूमी - 30-Dec, 2023, 09:33 AM
मागील काही दिवसापासून शेवगाव शहरासह तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात शेवगाव पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुस विक्रीसाठी घेऊन जाणार्या आरोपीला शहरातील गाडगेबाबा चौकात शिताफीने अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव जहीर उर्फ जज्या नवाब शेख (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव) असे असून त्याच्याकडून गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुस, दोन मोबाईल असा 48 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्याचे पोनि. दिगंबर भादाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम शेवगाव ते पाथर्डी रोडवरील गाडगेबाबा चौक येथे गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करुन पोनि. भदाणे यांनी पोलिस उपनिरीक्षक निरज बोकिल, पोहेकॉ. सुधाकर दराडे, पोकॉ. शाम गुंजाळ, पोशि. सानप, पोशि. मोरे यांचे पथक तयार करुन संबधित ठिकाणी खाजगी वाहनाने कारवाईसाठी पाठविले.
दरम्यान शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक अनोळखी इसम गाडगेबाबा चौक येथे येताना दिसला. त्या इसमाने पोलिसांना पाहताच ते पळून जावू लागला असता पोलिसांनी त्यास मोठ्या शिताफिने सापळा लावून पकडले. त्यास नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जहीर उर्फ जज्या नवाब शेख (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव) असे सांगितले.
यावर पोलिसांनी पंचासमक्ष सदरील व्यक्तीची अंगझडती घेतली असता त्याच्या डाव्या कमरेला एक गावठी कट्टा व मॅक्झीनमध्ये 3 जीवंत काडतूस व दोन मोबाईल असा एकुण 48 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात पोकॉ. शाम बाबासाहेब गुंजाळ यांचे फिर्यादीवरुन जहीर उर्फ जज्या नवाब शेख (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव) याच्याविरुद्ध गु.रजि. नं. 12.7/2023, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोसई. निरज बोकिल हे करीत आहेत.
bTWyZigCfVrH