पिचड पितापुत्रांच्या पाठपुराव्याला यश
अकोले । वीरभूमी - 06-Mar, 2024, 02:26 PM
अकोले येथे महाशिवरात्रीनिमित्त अगस्तीऋषी आश्रमाजवळ यात्रा भरत असते. या यात्रेनिमित्त येणार्या भाविकांच्या सुविधेसाठी प्रवरा नदी पात्रात सोडण्याची मागणी माजी मंत्री मधुकरराव पिचड व वैभवराव पिचड यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. या मागणीची दखल घेत प्रवरा नदी पात्रात गुरुवारी पाणी सोडण्यात येणार आहे. पिचड पितापुत्रांच्या पाठपुराव्याने पाणी सुटणार असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
अकोले येथील महर्षी अगस्तीऋषी आश्रमाजवळ दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने यात्रा भरत असते. या दिवशी तालुका व तालुक्याबाहेरील लाखो भाविक भक्त अगस्ती ऋषींचे दर्शन घेत असतात. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त भरणार्या यात्रेसाठी प्रवरा नदीला पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याने भाविक भक्तांमध्ये नाराजीचा सुर दिसत होता.
त्यामुळे अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरदराव नवले, नगरसेवक यांनी ही बाब माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या लक्षात आणून दिली. व तसे पत्र ही मा. जिल्हाधिकारी यांना पाठविले.
त्यामुळे माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांचेशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून प्रवरेला पाणी सोडण्यास सांगितले. पालकमंत्री ना. विखे पा. यांनी जिल्हाधिकारी यांना पाणी सोडण्याबाबत सूचना केली. त्यानुसार उद्या गुरुवारी प्रवरा नदीपात्रात महाशिवरात्री यात्रेनिमित्त पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक भक्तामध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे.
प्रवरेला पाणी सोडण्यात येणार असल्याने अकोले नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरदराव नवले व नगरसेवक यांनी पालकमंत्री ना. विखे पा., माजीमंत्री मधुकरराव पिचड आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांचे आभार मानले.
Comments