निवडीचा घोळ, आमदारकीचं मूळ
क्षितीज घुले यांच्या प्रयत्नाने झालेल्या निवडी दुसर्या दिवशी रद्द । अॅड. ढाकणेंची उद्या कार्यकारणी सभा
डावपेच । वीरभूमी- 27-Jun, 2024, 10:52 AM
महादेव दळे (संपादक) :
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी शेवगाव तालुक्यातील काही युवक कार्यकर्त्यांना विविध पदावर नियुक्त्या दिल्याबाबत पत्र दिले होते. मात्र दुसर्याच दिवशी या सर्व निवडी रद्द करत असल्याचे पत्राद्वारे जाहीरही केले. करण्यात आलेल्या निवडी या माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या शिफारसीनुसार करण्यात आल्या होत्या. निवडीनंतर क्षितीज घुले यांनी नूतन पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देवून शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र दुसर्याच दिवशी या निवडी रद्द केल्याने यामागे दबावतंत्र असल्याचे सुचित होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील पदाधिकारी निवडीवरुन घोळ झाला असून यामागे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भावी आमदारकीचे मूळ असल्याचे बोलले जात आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके यांनी जिंकली. तसेच राज्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने लढविलेल्या 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी विजय मिळवेल, असा कयास लावला जात आहे. यामुळे मविआकडून आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणुन अनेकांनी तयारी सुरु केली आहे. त्याचप्रमाणे मागील काही दिवसापासून शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी तयारी सुरु केली आहे. तसेच मागील विधानसभेला थोड्या मतावरुन पराभव झालेले अॅड. प्रताप ढाकणे यांनीही तयारी ठेवली आहे. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एक फेरीही पूर्ण केली आहे.
आगामी विधानसभेच्या अनुषंगाने माजी सभापती क्षितीज घुले यांच्या प्रयत्नाने दि. 25 जून 2024 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सुधाकर शिवाजी गिर्हे (रा. ढोरजळगाव), तालुका उपाध्यक्षपदी अशोक केशव जमधडे (रा. वाघोली), दीपक प्रभाकर चोपडे (रा. वडुले बु.), महेश भाऊ वाघमोडे (रा. भातकुडगाव), युवक कार्याध्यक्षपदी प्रवीण गोरक्ष मरकड (रा. भावीनिमगाव), युवक सचिवपदी महेश धर्मराज खताळ (रा. अंतरवाली) आणि शहर अध्यक्षपदी समीर शेख (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव) यांच्या निवडी करण्यात आल्या होत्या.
या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी दिले होते. मात्र दुसर्याच दिवशी दि. 26 रोजी युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी पुन्हा पत्र काढून शेवगाव तालुका व शहर या भागातून इच्छुक कार्यकर्ते जास्त असल्याने या सर्व निवडी स्थगित करण्यात येत असल्याचे सांगत पुढील काही दिवसात स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेऊन व बैठक घेऊन या निवडी करण्यात येतील असे पत्राद्वारे जाहीर केले.
यामुळे डॉ. क्षितीज घुले यांचे कार्यकर्ते नाराज झाले असून प्रस्थापित नेत्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांच्यावर दबावतंत्र वापरुन या सर्व निवडी रद्द केल्या असल्याचा आरोप करत या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. तर अॅड. प्रताप ढाकणे यांनी शुक्रवार दि. 28 रोजी विस्तारीत कार्यकारणी सभेचे आयोजन केले आहे. यामुळे शेवगाव तालुक्यातील राजकारण चांगलेच तापणार असल्याचे दिसत आहे.
अॅड. प्रताप ढाकणेंचीही विधानसभेसाठी तयारी : मागील विधानसभा निवडणुकीत अॅड. प्रताप ढाकणे यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. तेंव्हापासून पुन्हा विधानसभा डोळ्यासमोर ठेवत जनसंपर्क वाढविला. दोनवेळा मतदारसंघात संवाद यात्रा काढून तळागाळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर खंबीरपणे शरद पवार यांच्या सोबत राहुन एकनिष्टता दाखविली. तसेच लोकसभा निवडणुकीत विधानसभा प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केली. मतदारसंघात मेळावे घेत विधानसभेची जोरदार तयारी केली आहे. तसेच शुक्रवार दि. 28 जून रोजी शेवगाव येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ‘विस्तारीत कार्यकारणी सभा‘ आयोजित केली आहे.
घुले काका-पुतण्यात राजकीय वादाची चिन्हे? : शेवगाव तालुक्यातील राजकारणातील मोठे प्रस्थ म्हणुन घुले कुटुंबाकडे पाहिले जाते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर जिल्ह्यात पहिला झेंडा घुले कुटुंबाने घेत आतापर्यंत एकनिष्ट असल्याचे अनेकवेळा माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांनी आपल्या भाषणात जाहीरपणे सांगितले आहे. मात्र राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवार की अजित पवार, याबाबत मौन बाळगल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी अजित पवार गटात असल्याचे जाहीर करत महायुतीचा प्रचार केला. मात्र निवडणुकीनंतर शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी काही कार्यकर्त्यांना शरद पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीची पदे मिळवून देत त्यांचे अभिनंदन केले. यामुळे आगामी काळात काका-पुतण्यात राजकीय वाद होणार का? याबाबत चर्चा झडू लागल्या आहेत.
नवीन चेहर्यांना संधी मिळण्याच्या आशेने तयारी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे डॉ. क्षितीज घुले यांचे मामा आहेत. त्यातच मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी नवीन चेहर्यांना संधी देत जिल्ह्यातील 12 पैकी 6 जागांवर विजय मिळवला होता. त्याचीच पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होईल या आशेने क्षितीज घुले यांनी विधानसभेची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे.
Comments