विरोधकांना मात, घुलेंचे ‘परिवर्तन जनसंवाद’
विरोधकांच्या नरेटिव्हला घुले बंधुंचे उत्तर । शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीत येणार रंगत
महादेव दळे । डावपेच- 02-Jul, 2024, 10:29 AM
वीरभूमी ः नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात की, अजितदादा सोबत यावरुन घुले बंधूमध्ये दोन मतप्रवाह असल्याच्या चर्चा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघात सुरु झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर सर्वच काका-पुतण्यामध्ये राजकीय वाद असतात तसेच वाद घुले कुटुंबातही असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. एवढेच नव्हे तर विरोधकांकडून याबाबतचे नरेटिव्ह सेट केले जात होते.
या चर्चा दहिगावने जि. प. गटात जास्तप्रमाणात होत होती. मात्र सोमवारी घुले बंधूंनी एकत्र येत ढोरसडे येथे ‘परिवर्तन जनसंवाद’ मेळावा घेत विरोधकांच्या नरेटिव्हला चांगलेच उत्तर दिले आहे. मात्र शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात असतांनाही ‘परिवर्तन जनसंवाद’ मधून घुले बंधू काय डावपेच टाकतात, याकडे सर्व मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेली विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आत्तापासूनच एकमेकांवर डावपेच टाकत विधानसभेला कसा फायदा करुन घेता येईल याचा विचार सुरु केला आहे. याचाच एक भाग म्हणुन माजी आ. चंद्रशेखर घुले व माजी आ. नरेंद्र घुले यांच्यात राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत जायचे यावरुन वादंग सुरु झाल्याच्या चर्चांचे पेव फुटले होते. काहींनी तर इतर काका-पुतण्यांप्रमाणे घुले कुटुंबात वाद निर्माण झाल्याचे नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जात होता. विशेष म्हणजे याची जास्त चर्चा दहिगावने जिल्हा परिषद गटातच पहायला मिळाली.
मात्र दोनच दिवसात घुले बंधुंनी एकत्र येत ढोरसडे येथे ‘परिवर्तन जनसंवाद’ या मथळ्याखाली मेळावा घेत विरोधकांकडून करण्यात येणार्या चर्चांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. या मेळाव्यासाठी माजी आ. नरेंद्र घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले, माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, सेवा संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात शेवगावच्या परिपुर्ण विकासासाठी आपल्या हक्काचा माणुस लोकप्रतिनिधी म्हणुन विधानसभेमध्ये पाठविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असा संदेश देण्यात आला. तसेच या मेळाव्यात अनेकांनी विद्यमान लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शेवगाव तालुक्यात विकासकामे झाली नसल्याचा आरोप करत शेवगावच्या विकासासाठी विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा (शेवगाव तालुक्यातील) लोकप्रतिनिधी पाठविण्याचा चंग बांधला. एकंदरीत या मेळाव्यातून घुले बंधूंनी विधानसभेची चाचपणी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.
एकत्र मेळावा घेत घुले बंधूंचे विरोधकांना प्रत्यूत्तर : लोकसभा निवडणुकीपासून नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह, नरेटिव्ह सेट करणे या शब्दांचे अनेकदा उल्लेख आले आहेत. ‘नरेटिव्ह’ या शब्दाचा अर्थ काल्पनिक कथा असा होता. असेच नरेटिव्ह घुले बंधूबाबत पसरवले जात होते. याचमुळे इतर काका-पुतण्यांमध्ये सुप्त वाद असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र घुले बंधूंनी पुतण्यासह एकत्र येत विरोधकांच्या नरेटिव्हला चांगलेच प्रत्यूत्तर दिले आहे.
या मतदारसंघाची ही शेवटची निवडणूक : 2009 साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये संपूर्ण शेवगाव तालुका आणि पाथर्डी तालुक्यातील काही गावे मिळून शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ उदयास आला. यानंतर दोन्ही तालुक्यातील राजकीय समीकरणेच बदलून गेली. संसदेच्या कायद्यानुसार दर 20 वर्षांनी म्हणजे चार पंचवार्षिक निवडणुकीनंतर मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येते. यामुळे या मतदारसंघाची ही शेवटची निवडणूक मानली जाते. यामुळे पुढील मतदारसंघ पुनर्रचनेत आपल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्यासोबत कायम टिकवून ठेवण्यासाठी आगामी 2024 ची विधानसभा लढविण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यामध्ये कोणाला यश मिळेल हे येणारा काळच ठरवेल.
Comments