आ. मोनिका राजळे यांचे जिल्हाधिकार्यांना पत्र । सत्य समोर आणुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी
नगर । वीरभूमी - 23-Aug, 2024, 12:37 PM
मागील पाच सहा दिवसांपासून शेवगाव व पाथर्डी तालुक्यात रात्रीच्यावेळी ड्रोन फिरत असल्याच्या घटनांमुळे अनेक गावांतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन ड्रोन बाबतचे सत्य नागरिकांसमोर आणुन दिलासा द्यावा अशी मागणी आ. मोनिका राजळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अनेक गावांत मागील पाच-सहा दिवसापासून रात्री 8 वाजल्यानंतर ड्रोन फिरत आहेत. याबाबतचे फोन, मेसेज व माहिती नागरिकांकडून येत आहेत. तसेच एखाद्या गावातील वस्तीवर चोर आल्याच्या अफवाही पसरत आहेत. तसेच चोरीच्या उद्देशाने डोन फिरत असल्याच्या अफवा पसरत आहेत. यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांना रात्र जागून काढावी लागत आहे.
या सर्व प्रकारामुळे नागरीक भयभित झाले आहेत. तरी शासनाने पोलिस व महसूल यंत्रणेमार्फत या प्रकाराची सखोल चौकशी करुन नागरिकांना वस्तुस्थिती अवगत केली पाहिजे. व हा खोडसाळपणा असेल तर याबाबत योग्य कारवाई करुन शासनाने तालुक्यातील भयभित झालेल्या नागरीकांना माहिती देवून दिलासा देणे गरजेचे आहे.
तरी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गावांमध्ये रात्री फिरत असलेल्या ड्रोन बाबतची सखोल चौकशी करुन नागरीकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. मोनिका राजळे यांनी केली आहे.
Comments