शेवगाव । वीरभूमी - 04-Sep, 2024, 06:02 PM
तालुक्यातील जोहरापुर येथील अवैध दारु विक्री बंद करण्याबाबत अनेकवेळा शेवगाव पोलिस ठाण्याकडे मागणी करुनही शेवगाव पोलिसांनी डोळेझाक केल्यानंतर गावातील महिलांनी थेट खा. निलेश लंके यांना अवैध दारु बंद करण्याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली. या मागणीनंतर खा. निलेश लंके यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक यांनाच पत्र देत पंधरा दिवसात जोहरापुर येथील अवैध दारु विक्री बंद न झाल्यास गावातील महिलांसह पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जोहरापुर गावातील अवैध दारु विक्री बंद करण्याबाबत शेवगाव पोलिसांनी दुर्लक्ष का केले याबाबत सर्वसामान्यांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फक्त जोहरापुरच नव्हे तर तालुक्यातील प्रत्येक गावात हिच परिस्थिती आहे. मात्र शेवगाव पोलिस याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथे सुरु असलेली अवैध दारु विक्री बंद करण्याबाबत गावातील महिला आक्रमक आहेत. याबाबत गावातील महिलांनी अनेकवेळा शेवगाव पोलिस ठाण्यात येवून निवेदने दिली आहेत. मात्र याकडे शेवगाव पोलिस डोळेझाक करत असल्याने अवैध दारु विक्री बंद होत नाही.
मागील महिण्यात जोहरापुर येथील महिलांनी खा. निलेश लंके यांची भेट घेवून गावातील दारु विक्री बंद करण्याची मागणी केली. या मागणीनंतर खा. निलेश लंके यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, मतदारसंघातील जोहरापुर गावामध्ये राजरोस अवैध दारु विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली. याबाबत आपल्या विभागाकडून कारवाई होत असलेली दिसून येत नाही. अथवा आपल्याच पोलिस कर्मचार्यांकडून अशा धंद्यांना सूट मिळत आहे की काय? याबाबत शंका निर्माण होत आहे.
येथे अनेक दारु अड्डे व अवैध दारु धंदे सुरु असून येथील ग्रामस्थ व महिलांनी त्रासाला कंटाळून माझ्याकडे विनंती अर्ज केला आहे. तरी सदर विषयी तातडीने कारवाई न झाल्यास पुढील पंधरवाड्यात येथील महिला संघटनासह सुमारे 100 महिलांसह पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जोहरापुर येथील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी गावातील मनिषा ढगे, वंदना धायतडक, निर्मला कुसारे, राणी आहेर, वैशालू ढगे, सुरेखा देवढे, वर्षा बडे, वनिता ढगे, प्रियंका काकडे, इंदुबाई पानसंबळ, आरती पालवे, पुष्पा पालवे, उषा आव्हाड, सुनिता भारस्कर, राणी वावरे, नंदा आढळगे, माधुरी आढळगे, शितल उगलमुगले, सुमन उगलमुगले, वैशाली देवढे, रोहिणी देवढे आदीसह सुमारे 35 महिलांनी सह्या करुन खा. निलेश लंके यांचेकडे अवैध दारु बंद करण्याची मागणी केली आहे.
जोहरापुर येथील अवैध दारु बंद करण्यासाठी खुद्द खा. निलेश लंके यांनाच उपोषणाला बसावे लागणार असल्याने शेवगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे. अवैध दारु विक्रीने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असून याबाबत पोलिसांनी तातडीने जोहरापुरसह इतर ठिकाणी सुरु असलेले दारु विक्री, मटका, जुगार अड्डे बंद करण्याची मागणी होत आहे.
Comments