राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय । बेरोजगारांना मिळणार रोजगार
शेवगाव । वीरभूमी - 05-Sep, 2024, 08:36 PM
शेवगाव तालुक्यातील सोनेसांगवी येथील पिंगला सहकारी सूतगिरणीस शासकीय अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत नवीन वस्त्रोद्योग धोरणातील तरतुदीनुसार 15:35:50 या आकृतीबंधानुसार अटी व शर्तींच्या अधिन राहून शेवगाव तालुक्यातील सोनेसांगवी येथील पिंगला सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य देण्याचा निर्णय झाला.
शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते. यामुळे तालुक्यात मोठ्याप्रमाणात आर्थीक उलाढाल होत असते. तालुक्यात कापूस जिनिंग, ऑईल मिलच्या माध्यमातून होणार्या आर्थीक उलाढालीमुळे शेवगावची बाजारपेठ बहरली आहे.
आता राज्य शासनाने सोनेसांगवी येथील पिंगला सहकारी सूतगिरणीस 15ः35ः50 या आकृतीबंधानुसार अटी व शर्तीच्या अधिन राहुन अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
राज्य शासनाकडून आतापर्यंत राज्यातील 143 सूत गिरण्यांना शासकीय अर्थसहाय्य देण्यात आले आहे. शेवगाव तालुक्यातील सूतगिरणीला अर्थसहाय्य होणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे.
Comments