सामनगाव येथील घटना । संपूर्ण गावावर शोककळा
शेवगाव । वीरभूमी- 24-Oct, 2024, 11:47 PM
बंधार्यात पोहण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सामनगाव (ता. शेवगाव) येथे घडली. या घटनेमध्ये मयत शिक्षकाचे नाव दिपक सुर्यभान झाडे (वय 48) असे आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून या दुदैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथून वाहनार्या ढोरा नदीवरील बंधार्या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेला आहे. या बंधार्याचे नुकतेच सामाजिक संस्थेच्या मदतीने ग्रामस्थांच्या सहकार्यातून खोलीकरण करण्यात आले आहे.
हा बंधारा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्यानंतर गावातील काही तरुण नित्यनियमाने सकाळी पोहण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे दीपक झाडे हे आपल्या मित्रासोबत गुरुवार दि. 24 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी गेले होते.
बंधार्यानजिक पोहत असतांना ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. दिपक झाडे हे गटांगळ्या खात असतांना तेथे उपस्थित असलेल्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने ते पाण्यात बुडाले. तेथे उपस्थित व परिसरातील युवकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून शेवगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. या घटनेने संपूर्ण सामनगाव परिसरावर शोककळा पसरली. या घटनेची माहिती शेवगाव पोलिस ठाण्यात दिल्यानंतर तेथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर मृतदेहाची शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन दुपारी सामनगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत दिपक सुर्यभान झाडे (वय-48) हे नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
सामनगाव सेवा संस्थेचे चेअरमन व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुर्यभान झाडे यांचे ते चिरंजीव होत. तर छत्रपती संभाजीनगर येथील भुलतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर झाडे, माध्यमिक शिक्षक निवृत्ती झाडे व अध्यात्मिक क्षेत्रातील व्याख्याते गणेश महाराज झाडे यांचे ते चुलत भाऊ होत.
Comments