कार्यकर्त्यांकडून वैभव पिचड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
आणि जड अंतकरणाने वैभवराव पिचड यांनी केल्या उमेदवारी अर्जावर सह्या । हजारो कार्यकर्त्यांचा पिचड यांना निवडून आणण्याचा निर्धार
अकोले । वीरभूमी- 25-Oct, 2024, 06:49 PM
कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देत अखेर माजी आमदार वैभवराव पिचड यांनी मध्यरात्री रुग्णालयातच उमेदवारी अर्जावर मोठ्या जड अंतकरणाने सही केली. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी आज त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पिचड पिता पुत्रांवर प्रेम करणारे कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
मतदार संघाच्या विविध भागातून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील त्यांच्या समर्थकांनी यावेळी अकोलेत गर्दी केली होती. माजी मंत्री, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड हे 15 ऑक्टोंबर पासून नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचे सुपुत्र माजी आमदार वैभवराव पिचड त्यांच्या समवेत आहेत. निवडणूक जाहीर झाली आणि पिचड पिता-पुत्र रुग्णालयात दाखल झाले त्यामुळे निवडणुकी बाबत काय निर्णय घ्यायचा याबद्दल पिचड समर्थक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. अखेर कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन वैभवराव पिचड यांनी निवडणूक लढवावी असा निर्णय घेतला.तुम्ही फक्त उमेदवारी अर्जावर सह्या करा, बाकी निवडणुकीचे सर्व आम्ही पाहतो असे सांगत कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली. कार्यकर्त्यांचा निर्णय झाला तरी वैभवराव पिचड निवडणूक लढविण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
गुरुवारी रात्री तालुक्यातील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते नाशिकला पोहचले. त्यांनी वैभवराव पिचड यांचा उमेदवारी अर्ज सह्यांसाठी सोबत नेला होता. सहीसाठी खूप आग्रह कार्यकर्ते धरत होते. त्यांचे मन वळविण्याचा आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत होते तरी वैभवराव पिचड उमेदवारी अर्जावर सह्या करण्यास तयार होत नव्हते.कार्यकर्त्यांनी तुम्ही जर उमेदवारी अर्जावर सही केली नाही तर आम्ही रुग्णालया बाहेरच ठाण मांडून बसू, आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. अखेर मध्यरात्री वैभवराव पिचड यांचे सही साठी मन वळविण्यात कार्यकर्त्यांना यश आले.
मी आजपर्यंत पिचड साहेबांना विचारल्याशिवाय सही केली नाही, आणि साहेब आजारी असतांना मी उमेदवारी करणे मला योग्य वाटत नाही, असे भावनिक होऊन शेवटी जड अंतकरणाने माजी आमदार वैभव पिचड यांनी उमेदवारी अर्जावर सह्या केल्या.
साहेबांनी मला विचारल्यावर काय सांगू? असे म्हणताना सर्व वातावरण धीर गंभीर झाले होते. यावेळी वैभव पिचड व उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून येत होते. जर साहेबांची तब्येत बिघडली तर मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेईन असे वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यावेळी कार्यकर्ते म्हणाले की, त्यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील. असे सर्व काही बोलणे झाल्यावर माजी आमदार वैभवराव पिचड यांनी जड अंतकरणाने अखेर उमेदवारी अर्जावर सह्या केल्या. यावेळी भावनिक वातावरण निर्माण झाले. तालुक्यातील विविध भागातील कार्यकर्त आज सकाळ पासूनच अकोले येथील वैभवराव पिचड यांच्या जन संपर्क कार्यालय परिसरात यायला सुरुवात झाली.दुपारी एक वाजता सर्व कार्यकर्ते हे तेथून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा फोटो डोक्यावर उचलून घेत तहसील कार्यालय परिसरात पोहचले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, हभप. भाऊसाहेब सावळेराम जाधव, गोविंद बाबा उघडे व कासम गफुर मणियार हे अकोले तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी आमदार वैभवराव पिचड यांचा अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात गेले. या सर्वांनी पिचड यांच्या अनुपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांचेकडे पिचड यांचा अर्ज सादर केला.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे हेही उपस्थित होते. वैभवराव पिचड यांच्या उमेदवारी अर्जावर ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, जि. प.चे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, ज्येष्ठ नेते सोमनाथ मेंगाळ, बाबुराव गायकवाड, रामकृष्ण पांडे, राजू देठे, कासम मणियार यांच्या सूचक म्हणून स्वाक्षर्या आहेत.
तहसील कार्यालया बाहेर पिचड समर्थक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. पिचड साहेब लवकर बरे व्हा, वैभवभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणांनी तहसील परिसर दुमदूमून गेला होता. कार्यकर्त्यांनी प्रथम अगस्ति ऋषींचे दर्शन घेतले व दर्ग्यावर चादर चढविली. राज्यात कदाचित उमेदवार नसताना कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल करणे ही बाब आज विशेष जाणवत होती.
Comments