राजेंद्र म्हस्के । जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन केली मागणी
श्रीगोंदा । वीरभूमी- 23-Feb, 2025, 11:13 AM
श्रीगोंदा तालुक्याची सध्याची पाणी परिस्थिती पाहता तालुक्यातील छोट्या - मोठ्या बंधार्यात व पाझर तलावात कुकडीच्या चालू आवर्तनातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केले आहे.
श्री. म्हस्के यांनी जलसंपदा मंत्री ना. विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली आहे. त्यामुळे भविष्यात जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. सर्व नद्या, बंधारे कोरडे पडलेले आहेत. सध्याच्या चालू आवर्तनात शेतकर्यांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे. परंतु सुरू झालेल्या उन्हाळ्याचे चारही महिने पाणी टंचाई भेडसावणार आहे.
या कालावधीत शेतकर्यांना उभी पिके व फळबागा जगवणे अशक्य होणार आहे. त्यामुळे चालू आवर्तनात नदीद्वारे पाणी सोडून कुकडी लाभ क्षेत्रातल्या 80 टक्के गावांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे या शेतकर्यांचे कोट्यावधीचे नुकसान टाळणार आहे. अन्यथा 20 वर्षापासून जगवलेल्या फळबागा डोळ्यादेखत जळून जाण्याचा संभव आहे.
कालव्याच्या वितरीकाद्वारे शेवटच्या शेतकर्यांना पाणी मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून शेडगाव, टाकळी कडेवळीत, भिंगाण, चोराचीवाडी, घोडेगाव व चांडगाव येथील काही भागांना आजही पाणी मिळत नाही. याकरिता आपण अधिकार्यांकडून माहिती मागून संबंधित गावांना कसा न्याय मिळेल याकरिता अधिकार्यांना सुचना करण्यात याव्यात. कुकडीचे पाणी सुरू झाल्यापासून आजतागायत पहिलीच वेळ अशी आहे की आपल्यामुळे दुसर्या हंगामातले दुसरे हंगाम संपायच्या आधीच आपण आवर्तन सुरू केल्यामुळे शेतकर्यांच्या मनात आपल्याविषयी आदर निर्माण झाला आहे. व शेतकर्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून पारनेर, कर्जत तालुक्यातल्या सर्व ओढ्यांना पाणी सोडून बंधारे व पाझर तलाव भरले जातात. परंतु श्रीगोंदा तालुक्यात अपवाद वगळता कुठल्याही ओढ्याला समाधानकारक पाणी सोडले जात नाही. सिंचन होत असताना एकाएका उप वितरिकांची लांबी सुमारे 14 ते 15 किलोमीटर आहे. आणि या वितरिकांची क्षमता 150 ते 175 क्युसेक आहे. आणि या वितरकांना फक्त 1 दिवस आणि 1 रात्र पाणी सोडले जाते. त्यामुळे अखेरच्या शेतकर्यांना पाणी मिळत नाही. किमान 5 दिवस एका वितरिकेला पाणी सोडल्यास सर्व शेतकर्यांना पाणी मिळू शकेल. आजपर्यंतच्या सिंचनात कालव्या पासून 3 किलोमीटर अंतरावर असणार्या गावांना व गावातल्या शेतकर्यांना त्याचा फायदा होतो. परंतु वितरिका क्रमांक 10, 11, 12, 13, 14 यावरील शेतकर्यांवर कायमचाच अन्याय होत आहे.
या संपूर्ण परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या आवर्तनातून शक्य होईल तेवढे पाझर तलाव बंधारे भरून द्यावेत. त्याचबरोबर शेवटच्या लाभधारक शेतकर्यांना पाणी मिळेल असे नियोजन करावे. अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाऊसाहेब मांडे, पाटपाणी कृती समितीचे सचिव माऊली मोटे व महादेव म्हस्के उपस्थित होते.
7bdft1