शेवगाव । वीरभूमी- 04-Mar, 2025, 05:41 PM
शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक करुन पसार असलेला एरंडगाव भागवत येथील अनिरुद्ध मुकूंद धस याला शेवगाव पोलिसांनी पाठलाग करत जेरबंद केले आहे. अनिरुद्ध धस विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात 25 जुलै 2024 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील एरंडगाव भागवत येथील साईनाथ नामदेव भागवत यांनी दि. 25 जुलै 2024 रोजी शेवगाव पोलिस ठाण्यात आरोपी अनिरुद्ध मुकुंद धस याने फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. यामध्ये म्हटले होते की, एरंडगाव भागवत येथील अनिरुद्ध मुकुंद धस याने शेवगाव शहरातील पाथर्डी रोड, अंबिका कॉलनी येथे एडी नावाचे शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन सुमारे एक कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गु.र. नं. 618/2024 भादंवि कलम 420, 409, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी अनिरुद्ध धस याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान पोलिस निरिक्षक समाधान नागरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी समजली की, आरोपी धस हा शेवगाव शहरात आला आहे. या बातमीची खात्री केल्यानंतर पोनि. समाधान नागरे यांनी वेगवेगळी दोन पथके तयार करुन शेवगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती.
दरम्यान पथकामार्फत आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी अनिरुद्ध धस याचे राहते घरी पोलिस आल्याचे समजताच तो पळून जात असतांना पोलिसांनी पाठलाग करत मिरी रोडवरील सासरवाडी हॉटेल समोर त्याला पकडून वरील गुन्ह्यात अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. समाधान नागरे, अपोनि. अशोक काटे, पोहेकॉ. किशोर काळे, पोहेकॉ. चंद्रकांत कुसारे, पोना. संदीप आव्हाड, पोकॉ. शाम गुंजाळ, पोकॉ. संतोष वाघ, पोकॉ. राहुल खेडकर, पोकॉ. प्रशांत आंधळे, पोकॉ. संपत खेडकर, पोकॉ. मारुती पाखरे, पोकॉ. कृष्णा मोरे तसेच नगर दक्षिणचे सायबर सेलचे पोकॉ. राहुल गुड्डू यांच्या पथकाने केली. पुढील तपा सपोनि. अशोक काटे हे करत आहेत.
शेवगाव पोलिसांनी अटक केलेला आरोपी अनिरुद्ध मुकुंद धस याने आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोनि. समाधान नागरे यांनी केले आहे.
gbk07v