जवखेडे खालसा ग्रामस्थांचे पाथर्डी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण । कारवाई करण्याची मागणी
पाथर्डी । वीरभूमी- 05-Mar, 2025, 01:37 PM
तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा देवस्थान शेजारील देवस्थानच्या इनामी जमीनीवर असलेले अनाधिकृत बांधकाम व बेकायदेशीर चालविले जात असलेले उपहारगृह तातडीने हटवावे. या मागणीसाठी जवखेडे खालसा येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आ़दोलनात अमोल वाघ, शिवनाथ घाटुळ, भरत आंधळे, रामनाथ आव्हाड, सुनिल भोसले, विठ्ठल काळे, तुषार वाघ, रघुनाथ लांघे, विष्णू घाटुळ, राजेंद्र वाघ आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने सादर केली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही निवेदन पाठवले असून याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जवखेडे येथील कानिफनाथ देवस्थानच्या परिसरात अवैध व्यवसाय सुरू असून गावात दारूबंदीचा ठराव असताना ही या ठिकाणी दारु विक्री होते. दारू पिऊन मद्यपी मंदिर परिसरात धुडगूस घालतात. येणार्या नाथभक्त भाविकांना त्रास देतात. या प्रकारामुळे येथे नेहमीच भाविकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण असुन यातुन जातीय तेढ निर्माण होत आहे.
तरी या अवैध व्यवसाय व अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी. या देवस्थानची शेकडो एकर जमीन असुन या जमिनीवरील बांधकामांना शासनाची परवानगी आवश्यक असताना येथे कोणतीही परवानगी नाही. सर्व बांधकामे अवैध असुन व येथे कब्जा करण्यात आला आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. या प्रश्नाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत तातडीने कारवाई करावी व परिसरात शांतता प्रस्थापित करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
qj31q3