कृषी आयुक्तांचे जिल्हा कृषी अधिकारी यांना आदेश
अहमदनगर । वीरभूमी - 08-May, 2020, 12:00 AM
वाटर बँक म्हणुन शेतकर्यांसाठी वरदान ठरलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजना कृषी विभागाने गुंडाळली आहे. तसेच रोहयो व जलसंधारण कार्यक्रमातंर्गत योजनांसाठी 2020-2021 अर्थसंकल्पिय निधीच्या केवळ 33 टक्के निधी उपलब्ध होणार असल्याने यापुढे ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या नवीन कामे व नवीन आखणी करू नये आणि नवीन काम सुरू करू नये, असे निर्देश कृषी आयुक्तालयाने जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले आहेत.
याबाबत रोहयो व जलसंधारण विभागाचे सचिव यांनी पुणे विभागिय कृषी आयुक्त यांना दुरध्वनीद्वारे सुचना दिल्यानंतर आयुक्तालयाने कृषी अधिकारी यांना आदेश काढले आहेत.
रोहयो व जलसंधारण विभागाने सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेतकर्याला टंचाईच्या काळात पाणी टंचाईची झळ कमी प्रमाणात बसत होती. या योजनेअंतर्गत शेकडो शेततळे निर्माण झाल्याने शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी फळ पिक लागवडीकडे वळाला होता. शेततळ्यातील पाण्याचा वापर अनेक शेतकरी ‘वाटर बँक’ म्हणुन करत आहेत. मात्र यापुढे निधीच उपलब्ध होणार नसल्याने शेतकर्यांना योजनेच्या लाभाला मुकावे लागणार आहे. यामुळे शेतकर्यांमधून नाराजीचा सुर निघत आहे.
ok good information.