शेतकरी आर्थिक संकटात । फुलांच्या किंमती वधारणार
सुपा । वीरभूमी - 11-Oct, 2020, 12:00 AM
सुपा परिसरात गेल्या दोन तीन दिवसात पावसाने पुन्हा जोर धरल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे फुलझाडे उफाळली आहेत. यामुळे दसरा दिवाळी सणामध्ये फुलांच्या किंमती वधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील महीन्यात 6-7 सप्टेंबर रोजी सुरु झालेला पाऊस सलग 15 दिवस झाला. मध्यंतरी आठ दहा दिवस उघडीप दिल्यानंतर पुन्हा शनिवार दि. 10 ऑक्टोबर पासून पुन्हा जोरदार पावसास सुरुवात झाली आहे. तर हवामान खात्याने पुढील काही दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
अगोदरच सप्टेंबरच्या पावसाने मोठ्या प्रमाणात फुलशेतीचे नुकसान झाले आहे. त्यातुन ज्या काही थोड्याफार फुल बागा वाचल्या आहेत त्या आताच्या या पावसात जगण्याची आशा मावळली आहे.
सततच्या पावसाने फुलशेतीचे झाडे मुळापासुनच करपू लागली आहे. आताचा हा कालावधी फुले उमलण्याचा आहे. मोठ्या प्रमाणात कळ्यामधून फुले उमलत आहेत. याचवेळी रोज पडणार्या पावसाने फुलांच्या गाभ्यात पाणी साठुन फुले सडत आहेत. तर काही ठिकाणी खाली ओलावा व वर पाण्याने जड झालेली फुले यामुळे नाजुक झाडे पावसात आलेल्या वार्याने भूईसपाट होत आहे.
दसरा दिवळीच्या सणा निमित्ताने सुपा परिसरात शेंवती, झेंडू, अष्टर, गुलछडी, गुलटोप गलांडा ही फुलेशेती घेतली जातात. त्यांना गणपती, नवरात्र, दसरा व दिवाळीत खुप मागणी असते. शेतकर्यांचे सणासुदीच्या काळात याच फुलशेतीमुळे मोठे अर्थकारण फिरते. गेली सात आठ महीने पाणी भरुन खते, औषधे, बी बियाने यांना मोठा खर्च केल्यावर आता कुठे दोन पैसे मिळणार असतांनाच निसर्गाने तोंडचा घास पळवला आहे.
शहाजापूर येथे तर काही शेतकर्याचे शेंवती पिक पुर्ण वाया गेल्याने त्यांनी ते एक रुपयाचेही उत्पन्न न मिळवता काढुन टाकण्यास सुरूवात केली आहे. चालू वर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने अगोदर मूग पिक गेले. भाजीपाल्याची पिके सडली. बाजरी पिकेही ऐन काढणीच्या काळात वादळी वार्यांनी सपाट झाली. आता थोडीफार आशा फुलशेतीवर होती, तीही आता संपली आहे.
Comments